Harshvardhan Patil : इंदापूरात कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं हत्यार उपसलं, हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं अजितदादा आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीतील गणित
Harshvardhan Patil, इंदापूर : इंदापूर (Indapur) विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं हत्यार उपसलय.
Harshvardhan Patil, इंदापूर : इंदापूर (Indapur) विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं हत्यार उपसलय. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन करत महायुतीत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे उद्याची इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढतील का? असा प्रश्न विचारला जातोय.
कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचं हत्यार उपसलं, हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विस्ताराने चर्चा केली होती. त्यावेळेस असं ठरलं की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. मात्र, निर्णयापर्यंत ती प्रक्रिया आलेली नाही. मला वाटतंय लोकसभेवेळी जी चर्चा झाली. त्याबाबतची स्पष्टता जागा वाटपावेळी होईल. गेल्या काही वर्षात कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय. इंदापूर 1952 सालापासून आहे. इतरांच्या तालुक्यासारखा हा तालुका नाही.
महाविकास आघाडीतही याबाबत निर्णय झालेला नाही
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, निवडणुकीचं वातावरण सुरु झालंय. आमच्या कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करत असतो. एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की, महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आमची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मात्र, कोणत्या जागा कोणाला जाणार? याबाबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. केंद्रीय नेतृत्व याबाबत चर्चा करेल. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात अंतिम प्रक्रिया झालेली नाही. दुसरा भाग म्हणजे महाविकास आघाडीतही याबाबत निर्णय झालेला नाही. आम्ही कायमच लोकांच्या संपर्कात असतो. गेली 10 वर्ष मी संविधानिक पदावर नसलो, तरी रोज आमचे तळागापर्यंत कार्यक्रम सुरु असतात. आम्ही जवळपास 25 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आम्ही करतोय. आम्ही मागील 6 महिन्यांपूर्वी ही काम मंजूर करुन आणली होती.
1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्यात
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 2019 प्रमाणे इंदापूरची जागा सोडणार नाहीत. हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा दगा देतील हे ओळखूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हे बंडाचा हत्यार उपासलं असल्याचे बोलले जात आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्यात. अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटलांनी 2019 ला काँग्रेस सोडली होती, पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील आणि पुन्हा इंदापूरच्या जागेवर दावा करतील हे ओळखूनचं हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता पेटून उठला असल्याच्या चर्चा आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या