Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
Bhandara News : भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत काम करत असताना क्रेनचा हूक तुटून अंगावर पडल्यानं दोन कामगार गंभीर जखमी झालेत.
भंडारा : भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत काम करत असताना क्रेनचा हूक तुटून अंगावर पडल्यानं दोन कामगार गंभीर जखमी झालेत. ही घटना आज(27 जानेवारी) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गंभीर कामगारांवर भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. जखमी कामगारांमध्ये एक लाडका भाऊ योजनेअंतर्गत कामगार असून दुसरा कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आशिष लिल्हारे (वय 25 वर्ष) आणि बादल झंजाड (वय 24 वर्ष) असं जखमींचं नावं आहे. दरम्यान, जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अन्यथा कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशारा जखमींच्या नातेवाईकांनी दिला आहे.
भंडारा आयुध निर्माणीतील मुख्य महाप्रबंधकांसह दोन महाप्रबंधकांची तडकाफडकी बदली
भंडारा आयुध निर्माणीत झालेल्या दुर्घटनेनंतर आता भारतीय रक्षा मंत्रालयानं भंडाऱ्याच्या आयुध निर्माणीतील मुख्य महाप्रबंधकांसह दोन महाप्रबंधकांची तडकाफडकी बदली केली आहे. भंडाऱ्याचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे यांची अरुवंकाडू इथं बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मुख्य महाप्रबंधक म्हणून अरुवंकाडूचे दीपक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य महाप्रबंधक सप्रे यांच्यासह महाप्रबंधक ललित कुमार आणि महाप्रबंधक अनुज प्रसाद यांचीही भंडारा येथून पुणे इथं बदली करण्यात आली आहे. या दोघांच्या जागेवर महाप्रबंधक म्हणून उदय कुमार शर्मा आणि दुसरे महाप्रबंधक म्हणून विकास पूरवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २४ जानेवारीला भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत झालेल्या स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू झाला. तर, ५ जण गंभीर झाले असून त्यांच्यावर भंडारा आणि नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे गेल्या 2 महिन्यापासून थकले होते. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाने 242 कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत नोंदणी केलेल्या 1 लाख 50 हजार 666 शेतकऱ्यांपैकी 75 हजार 153 शेतकऱ्यांनी 23 लाख 48 हजार 365 क्विंटल धानाची विक्री केली आहे.
फेडरेशनने आतापर्यंत एकूण 540 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी केली आहे. यापैकी 294 कोटी रुपयांचे चुकारे गेल्या 2 महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने 242 कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा केले जाणार असल्याचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा