Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
Beed news: महादेव मुंडे यांची परळीत हत्या झाली होती. सुशील कराडवर सुरेश धसांचे गंभीर आरोप. बीडचे पोलीस उपअधीक्षक याप्रकरणाचा तपास करत आहेत.
बीड: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मुंडे कुटुंबीयांनी सोमवारी अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांच्या पतीच्या हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत चर्चा केली. या चर्चेअंती बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीला आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची फाईल आम्हाला पाठवली नाही. ही फाईल आज आम्हाला मिळेल. त्याचा अभ्यास करुन मी काय तपास करायचा हे सांगतो. तसेच अनिल चोरमले यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करू असे आश्वासन दिले मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. या प्रकरणाच्या फाईलची स्टडी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा मुंडे कुटुंबियांशी चर्चा होणार आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्याचे मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे.
बीडचे पोलीस डीवायएसपी नेमकं काय म्हणाले?
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात आम्ही 100 टक्के रिझल्ट काढू. अजून परळीच्या पीआयने ती फाईल आमच्यापर्यंत पाठवली नाही, अजून त्यांच्या केसची कागदपत्रं इथपर्यंत पोहोचलेली नाहीत. ही फाईल आज आम्हाला मिळेल. त्यानंतर चार पाच दिवसांमध्ये ही फाईल वाचून मी तुम्हाला पुढील माहिती देतो. मला चार दिवस द्या, मी याप्रकरणाचा फॉलोअप घेतो. आपण आरोपीला 100 टक्के पकडू, असे बीडचे पोलीस डीवायएसपी अनिल चोरमले यांनी यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीला सांगितले. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महादेव मुंडे हत्याप्रकरण नेमकं काय?
परळी तालुक्यातील भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला होता. 22 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयाजवळील प्रांगणात महादेव मुंडेंचा मृतदेह आढळला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 14 महिने उलटले तरी आरोपी फरारच आहे. या खून प्रकरणाचा परळी पोलिसांकडून तपास करण्यात आला नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. महादेव मुंडे हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि प्रगतीला उशीर झाल्याचा आरोप होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश दिले होते.
वाल्मिक कराडचा मुलगा गोत्यात येणार?
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता आहे. महादेव दत्तात्रेय मुंडे या पिग्मी एजंट, दूध व्यवसायिकाचा 21 ऑक्टोबर 2023 च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर हातावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला होता.
आणखी वाचा