कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
Eknath Khadse & Gulabrao Patil : एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात.
Eknath Khadse & Gulabrao Patil : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे आज चक्क एकत्र जेवण करत असल्याचे शासकीय विश्रामगृहात पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा देखील झाली. दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माहिती समोर आलेली नाही.
एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचे निमित्ताने गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे दोघे एकत्र आले होते. दोघांनी सोबत केलेल्या जेवणाची जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांची अर्धा तास चर्चा
एकनाथ खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अँटी चेंबरमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा देखील आली. त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह इतर नेते मंडळी दाखल झाली. यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र, दोघांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ खडसेंची महायुतीवर टीका
दरम्यान, यानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतरही एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरणे हे सरकारमधील मंत्र्यांचे आचरटपणाचे आणि हावरटपणाचे लक्ष असल्याची टीका त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली आहे. तसेच एस टीच्या भाववाढीचा देखील एकनाथ खडसे यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटलंय की, ही भाव वाढ म्हणजे सर्व सामान्य जनेतेच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार आहे. सरकारने तोटा सहन करायला हवा होता. एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर सरकारकडे येणे आहे, ज्या विविध सवलती दिल्या आहेत त्याचे येणे जरी दिले तरी एसटीच्या संदर्भातील भाव वाढ करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच एसटी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
आणखी वाचा
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट