Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. हत्येपूर्वी त्यांना खूप यातना दिल्या गेल्या. देशमुख यांनी पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणीला विरोध केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली गेली.
Anjali Damania on Ajit Pawar : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात अत्यंत आक्रमकपणे आवाज उठवून कारवाईस भाग पाडलेल्या सामाजिक कर्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. अजित पवार धनंजय मुंडेंविरोधात पुराव्याच्या प्रतीक्षेत असतील, तर ते पुरावे घेऊन जाण्यासाठी तयार असल्याचे सांगत त्यांनी कारवाईसाठी दंड थोपटले आहेत.
मरेपर्यंत लढत राहीन, पण बीडचे जे कृत्य केले गेले ते....
दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा 36चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? ते पुरावे घेऊन जाण्यासाठी वेळ मागितली आहे. बघू कधी वेळ देतात.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 27, 2025
अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
अशा…
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला फाशी झालीच पाहिजे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर कटाचा आरोप असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. राज्यभरात जन आक्रोश मोर्चे निघत असून वाल्मिक कराडविरोधात आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
खंडणीला विरोध केल्यानंतर निर्घृण हत्या
गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. हत्येपूर्वी त्यांना खूप यातना दिल्या गेल्या होत्या. संतोष देशमुख यांनी पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणीला विरोध केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि वाल्मिकी कराड हे आरोपी आहेत. त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे. संशयास्पद भूमिकेमुळे पीएसआय राजेश पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका व्हिडिओमध्ये ते आरोपीसोबत दिसले होते. पीडित कुटुंबाने महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बीडला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. आरपीआयचे नेते आणि एनडीएचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या