(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईडी, भाजप ते अमित शाह; पवार-राऊतांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे
Sharad Pawar & Sanjay Raut Interview in Pune: 'महाराष्ट्र कनेक्ट' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली.
Sharad Pawar & Sanjay Raut Interview in Pune: 'महाराष्ट्र कनेक्ट' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत ज्ञानेश महाराव यांनी घेतली. या मुलाखतीत पवार आणि राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देत भाजपवर हल्ला चढवला आहे. याच मुलाखतीमधील काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ...
हनुमान चालीसा प्रकरणावर पवार म्हणाले
हनुमान चालीसा प्रकरणात बृजभुषण सिंह यांना मॅनेज केल्याचा आरोप शरद पवार यांच्यावर मनसेने केला होता. यावरच उत्तर देताना ते म्हणाले आहेत की, ''बृजभुषण सिंह ही कोणी मॅनेज करू शकेल अशी व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो. पण प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. बृजभुषण सिंह यांना मॅनेज करण्यात आलं हे डोक्यातून काढून टाका.''
ईडीच्या प्रश्नावर पवार-राऊत म्हणाले
राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्री आणि नेत्यांच्या घरावर ईडीचे धाड सत्र सुरू आहे. यावरच ईडीमुळे कितपत त्रास होतोय? असं विचारलं असता पवार म्हणाले की, ''हे गंभीर आहे. मला जेव्हा ईडची नोटीस आली तेव्हा मी म्हटलं की मीच येतो. मग ईडीचे अधिकारी हात जोडत आले की तुम्ही येऊ नका. त्यासाठी आपले नाणे खणखणीत हवं.'' तर यासंबंधित प्रश्नावर राऊत म्हणाले की, ''2024 नंतर त्यांना कळेल. वक्त हमारा भी आएगा. तर याचा त्रास होतो म्हटलं तर नाही. पुष्पा मधला डायलॉग आहे, मै झुकेगा नही. कोणतीही नोटीस न देता ईडी चौकशी केली. मात्र ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर आलं, त्यावेळी मी अमित शहांना फोन केला आणि म्हटलं त्या गरिबांना त्रास देऊ नका त्यापेक्षा मला अटक करा.''
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले
सत्तेत असताना शरद पवार आणि त्या आधीचे शरद पवार यांच्यात कोणता फरक जाणवतो, असा प्रश्न राऊत यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ''शरद पवार तेच आहेत त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही तरुण असताना ज्या शरद पवारांच्या प्रेमात पडलो, तेच शरद पवार आजही आहेत.''
काश्मीर फाईल्सवर पवार यांचा भाजपवर हल्लाबोल
काश्मीर फाईल्स हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट आल्यानंतर भाजपने काश्मिरी पंडितांचा विषय उचलून धरला. यावरच बोलताना पवार म्हणाले, ''भाजपने काश्मीरमधील पंडितांची हत्या इतरांच्या कार्यकाळात झाल्या असा खोटा प्रचार केला. आधीही भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या सरकारच्या काळात पंडितांच्या हत्या झाल्या.''
सोशल मीडियाच्या दुरुपयोगावर पवार यांनी व्यक्त केली चिंता
सध्या सोशल मीडियाच्या होत असलेल्या दुरुपयोगावर शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं आहे की, ''काही गोष्टी गांभीर्याने मांडायच्या असतात. त्यासाठी स्पष्टता हवी. सोशल मीडियावर गांभीर्यता नाही.''
संबंधित बातमी:
भाजप समोर 'झुकेगा नही साला', मला अटक करा ते थेट अमित शहांना फोन... संजय राऊतांची UNCUT मुलाखत