Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिन्नरकरांना मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिककरांची फसवणूक केली, अशी चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्याने महायुतीला एकतर्फी कौल दिला. जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघापैकी 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Vidhan Sabha Constituency) माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासाठी घेतलेल्या सभेत मोठे आश्वासन दिले होते. माणिकराव कोकाटे यांना निवडून आणा, मी त्यांना मंत्री करतो, असा शब्द दिला होता. सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे हे भरघोस मतांनी निवडून आले. त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचा पराभव केला. यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार दिलेला आपला शब्द पळणार का? याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले होते. मात्र, अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला. माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाले.
देवेंद्र फडणवीसांकडून आमदाराला डच्चू
तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड विधानसभा मतदारसंघात (Chanwad Vidhan Sabha Constituency) राहुल आहेर (Rahul Aher) यांच्यासाठी सभा घेतली होती. या सभेत बोलताना मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारातच चांदवड-देवळाकरांना न्याय देईल. 20 हजारांच्या आत लीड असला, तर राज्यमंत्री आणि 20 हजारांच्या वर लीड दिल्यास कॅबिनेट मंत्रिपद देईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. विधानसभा निवडणुकीत राहुल आहेर हे तब्बल 50 हजारांच्या लीडने निवडून आले. यानंतर राहुल आहेर यांना मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या शपथविधीत चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना डावलण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासघात केल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राहुल आहेर नेमका काय निर्णय घेतला? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या