Congress : कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबीरातील ठराव विदर्भात अमान्य?
आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर, अंतर्गत टीकेला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यवतमाळ : कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने 'एक व्यक्ती-एक पद' या तत्वावर पक्षात पद देण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिरातील ठराव विदर्भात अमान्य आहे का? असा सवाल जिल्हा कॉंग्रेसचे (congress) उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समुदाय आणि शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे. विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
अलिकडच्या काळात विविध निवडणूकीत पराभवाचा सामना करत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी उदयपूर (Navsankalp Shibir) येथे नुकतेच नवसंकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पद मिळावे आणि त्यांनी पक्षविस्तारासाठी कार्य करावे यासाठी विविध धोरण ठरविण्यात आले होते. तसेच 'एक व्यक्ती - एक पद' असा ठराव कॉंग्रेस हाय कमांडच्या उपस्थितीत उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात झाला असताना यवतमाळ जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. वजाहत मिर्झा एक, दोन नव्हे तर सहावे पद सन्मानाने बहाल करण्यात आल्यामुळे कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते कडवट टिका करू लागले आहेत.
जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समुदाय आणि शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टिका केली आहे. वजाहत मिर्झा यांना पदांची खिरापत वाटणाऱ्या आमच्या नेत्यांवर हायकमांडने कारवाई करण्याची गरज आहे. पक्षाच्या अशा धोरणांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. अनेक पदांवर एकाच नेत्याची वर्णी आणि इतर पदांवर त्यांची मुले व नातेवाईक, यामुळे प्रामाणिक व मेहनती कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळेच कार्यकर्ते सैरभैर झाले असून इतर पक्षांची वाट धरत आहे.
श्रेष्ठींनी या बाबींची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ते घातक ठरणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसला सत्तेत स्थान मिळू शकले. पण हे असेच सुरू राहिल्यास 2024 मध्ये कॉंग्रेसचा पार धुव्वा उडणार असल्याची भितीही सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. पक्षातील काही नेते हायकमांडची दिशाभूल करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. आता कर्तव्य कठोर असलेले आणि प्रसंगी भल्याभल्यांना अंगावर घेणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून 'एक व्यक्ती - एक पद' या धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही सिकंदर शहा यांनी केली.
कॉंग्रेस कार्यकर्तेही चक्रावले
एक व्यक्ती - एक पद, असे धोरण राहील, अशी घोषणा चिंतन शिबीरात करण्यात आली होती. मात्र कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा हे पूर्वीच पाच पदे भूषवीत असताना त्यात पुन्हा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्षपद देण्यात आल्याने पक्षाने स्वतःच्या धोरणाला तिलांजली दिल्याची टिका कॉंग्रेसचे जवळपास सर्व नेते करीत आहेत. मुंबईच्या बैठकीत राज्य प्रभारींनीही या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली. सततच्या पराभवांनंतरही ज्येष्ठ नेते धडा घेत नसतील, तर कॉंग्रेसचे पतन अटळ आहे, असा सूर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आवळत आहेत.
हे वाचलं का
Sanjay Raut : महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार येणार नाही; संजय राऊतांचा घणाघात