Ajit Pawar: अजित पवार म्हणाले आमदार बदलला पाहिजे; आता युगेंद्र पवार उतरले बारामतीच्या मैदानात
Ajit Pawar: लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता.
पुणे : राज्यात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. मात्र, उमेदवारांची घोषणा करण्यात मनसेनं आघाडी घेतली असून राज ठाकरेंनी मनसेच्या 7 उमेदवारांची आत्तापर्यंत नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर, आज असदुद्दीन औवेसी यांनीही संभाजीनगर दौऱ्यात विधानसभेसाठी 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाची चर्चा आहे. मात्र, लोकसभेप्रमाणेच यंदाही बारामती विधानसभेच मतदारसंघ चर्चेत असणार आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी बारामीत मतदारसंघात माझ्याऐवजी दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे म्हटले. त्यानंतर, आज लगेचच युगेंद्र पवार (Yugendra pawar) यांनी बारामती (Baramati) दौऱ्याची घोषणा केली आहे. स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी प्रचार करणार आहेत.
लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता. आता, बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार उद्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावागावात युगेंद्र पवार जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजून सांगणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.
साधारण 10 दिवसांचा हा दौरा असून मतदारसंघातील सर्वच गावांत गाठीभेटी देऊन लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी उत्तर देणं टाळलं. सुशिक्षीत बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, मागच्या 20 ते 25 वर्षात लोकसंख्या आणि बेरोजगारी खूप वाढली आहे. या प्रश्नावर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, पाण्याचा प्रश्नही बारामती तालुक्यात महत्त्वाचा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं.
बारामतीतून अजित पवारच लढतील
बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली. अजितदादा आमचे कॅप्टन आहेत. ते बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे भुजबळ यांनी म्हटले. तर, तटकरे यांनीही बारामतीची जागा अजित पवारच लढवणार असल्याचे स्पष्ट केले.