(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sai Baba : तीन वर्ष, तीन सरकार, तरीही विकासनिधीची प्रतीक्षाच, पाथरीचा विकास आराखडा अडकला शासन दरबारी
Sai Baba : साई बाबांच्या जन्मभूमीवरून पाथरी विरुद्ध शिर्डी सुरु झालेल्या वादावर विकास आराखड्याचा तोडगा काढण्यात आला. पण पाथरीतील साई जन्मभूमीचा विकास आराखडा शासन दरबारी रखडलाय.
Parbhani : साई बाबांच्या जन्मभूमीवरून पाथरी विरुद्ध शिर्डी सुरु झालेल्या वादावर विकास आराखड्याचा तोडगा काढण्यात आला. पण पाथरीतील साई जन्मभूमीचा विकास आराखडा शासन दरबारी मागच्या तीन वर्षांपासून रखडलाय. तीन वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले, मात्र विकास निधी काही मिळाला नाही. तत्कालीन राष्ट्रपतींचे आश्वासन, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची घोषणाही हवेतच जिरल्याने पाथरीचा विकास आराखडा मंजूर होणार का? त्याला निधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय?
जगभरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साई बाबांचे जन्मस्थान पाथरी की शिर्डी यावरून मागची अनेक वर्ष वाद सुरूय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात साई जन्मभुमी पाथरी असल्याचा उल्लेख केला. स्वतः येऊन दर्शन घेतले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात साई जन्मभुमीचा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन जानेवारी 2020 ला मुख्यमंत्री ठाकरेंनी साई जन्मभूमी च्या 100 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली. तिथून या वादात ठिणगी पडली. शिर्डीकरांनी साई जन्मभूमी पाथरीला विरोध केला. शिर्डी बंद केले. परभणी, पाथरी तही आंदोलनं झाली. देशभरातील मीडियाने याची दखल घेतली. देशाच्या केंद्रस्थानी पाथरी आले. तब्बल 10 दिवस वाद चालल्यानंतर मुख्यत्र्यांनी यावर तोडगा काढत तात्काळ निधी देण्याचे जाहीर केले आणि वाद मिटला. हा आरखडा 100 कोटींवरून 149 कोटींवर आला. तब्बल तीन वर्ष झाले तरीही निधी न मिळाल्याने इथला विकास आराखडाच शासन दरबारीच पडून आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तांची मात्र चांगलीच गैरसोय होतेय.
साई बाबांच्या जन्मभुमीवरून वाद झाला. याच वादातून देशासमोर पाथरी शहर आले. इथले साई बाबांचे घर, त्यांचं मंदिर, मुर्ती, इतर बाबी जगासमोर आल्याने इथं मोठी वर्दळ वाढलीय. परंतु साई बाबांचे मंदिर हे शहराच्या मध्यभागी असल्याने अरुंद रस्त्यांमुळे मंदिरापर्यंत भक्तांना जाता येत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही, प्रसादालय नाही, राहायची सुविधा नाही, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव साजरे करण्यासाठीच्या सभागृहाची वानवा. प्रसाधन गृह नाही, अशा एक ना अनेक समस्या याठिकाणी उद्भवलेल्या आहेत, ज्याचा फटका भक्तांचा बसतोय. आणि साहजिकच इथल्या व्यापारावरही त्यांचा परिणाम होतोय.
नेमका साई बाबा तीर्थक्षेत्र आरखडा काय आणि किती टप्पे ?
एकूण आराखडा 149 कोटी 5136 रुपये - दोन टप्प्यात
फेज एक - 96 कोटी एक लाख 13 हजार 897 रुपये
फेज दोन - 52 कोटी 98 लाख 91 हजार 239 रुपये
याच आराखड्यानुसार नेमके काय विकास कामे होणार हेही पाहुयात -
मंदिर परिसरातील जमिनीचे अधिग्रहण व तेथील रहिवाश्यांचं पुनर्वसन
मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, नाल्या, पथदिवे, दिशादर्शक फलक
मुख्य प्रवेशद्वार, दर्शनवारी हॉल, फुल, प्रसादाची बाजारपेठ, प्रसाधन गृह
भव्यदिव्य भक्त निवास, प्रशस्त प्रसादालाय आणि इतर विकास कामे
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे साई बाबांचे मोठे भक्त आहेत. ते बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी पाथरी येथे येऊन साई बाबांचे दर्शन करत होते. सर्व परिसर पहिला होता त्यानंतर ते देशाचे राष्ट्रपती झाले आणि त्यांनी पाथरीच्या विकासाचा पाठपुरावा केला. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी विकास आरखडा तयार करून घेतला आणि निवडणूका लागल्या. त्यानंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी ही यासाठी 100 कोटी जाहीर केले. मात्र अद्याप पुढे काही झाले नाही. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उचाधिकार समिती स्थापन झाली याच समितीच्या बैठका ही झाल्या नाहीत. 18 आगस्ट रोजी याच विकास आराखडा मंजुरीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र तीही रद्द झाल्याने पाथरी बरोबरच जिल्हावासियांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला.