(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीत 'लाडक्या बहिणीं'ची बँकेत गर्दी; नवीन खाते, बँक पासबूक, केवायसीसाठी बँकेत भलीमोठी रांग
Ladki Bahin Yojana : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे.
परभणी : राज्य सरकारने 1 जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणी बहिणींची गर्दी उसळली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील विविध भागात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असल्याचं दिसून येतंय.
या योजनेसाठी लागणारे बँक पास बुक झेरॉक्स, खाते क्रमांक आदींची गरज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांनी बँक खाते उघडले नसल्याने तसेच खात्याची केवायासी न केल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. जिंतूर तालुक्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे.
सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बँकेत तोबा गर्दी होत आहे. तर यापूर्वी ज्या महिलांनी बँक खाते उघडले होते परंतु त्याचा वापर केला नाही असे खाते नव्याने चालू ठेवण्यासाठीदेखील महिलांची लगबग सुरु झाली आहेत. त्यासाठी केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.
अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचार्यांची दमछाक होऊ लागली आहे. दैनंदिन कामांबरोबरच या योजनेसाठी नवीन खाते उघडण्यासाठी आणि बंद असलेले खाते चालू ठेवताना कर्मचार्यांची तारेवरची कसरत होत आहे. तर यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मोठी अडचण होत असून लहान मुलाबाळांना घेवून दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे लाडक्या मुख्यमंञी भावाने कागदपत्रांचा त्रास कमी करावा अशी विनंती लाडक्या बहिणींकडून होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्रं लागणार?
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
- योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
ही बातमी वाचा :