(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट दोघांचीही दुरावस्था झाली आहे. यानंतर आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद यश मिळवले. या यशाचा फटका मविआमधील (MVA) तीन पक्षांना बसलाच पण सोबत राज ठाकरेंचा मनसे पक्ष सुद्धा भरडला गेला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना 20 वर घसरली तर मनसेला (MNS) खातं सुद्धा उघडता आलं नाही. ठाकरेंना सात-आठ जागांवर मनसेची अनपेक्षितपणे मदतच झाली. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का?
निवडणुका जवळ आल्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न नेहेमी विचारला जातो. या प्रश्नाचं सरळ, स्पष्ट आणि संभ्रम कमी करणारं उत्तर कधीच मिळत नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, जय पराजयाचं विश्लेषण सुरु झालं आणि पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नानं डोकं वर काढलं आहे. त्याचं कारण म्हणजे अमित राज ठाकरेंसहीत मनसेनं उभा केलेले सर्व 128 उमेदवार पराभूत झाले. पण मनसेनं ठाकरेंचा फायदा झालाय. मुंबईत आदित्य ठाकरेंच्या वरळीसहीत काही ठिकाणी मनसेनं मतं घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. हे दोन्ही बंधू एकत्र असते तर चित्र वेगळं असतं मुंबईकरांना अजुनही वाटतंय.
ठाकरे बंधू एकत्र यावेत या चर्चा संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावरही पोहचल्या. ठाकरेंच्या कुटुंबातील राजकीय शत्रुत्वाचं मैत्रीत रुपांतरं व्हायला हवं का असं आम्ही त्यांना विचारलं. हा फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादित प्रश्न नाही. ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकाने एकत्र आलंच पाहिजे. मग ते प्रकाश आंबेडकर असले तरी त्यांनी देखील एकत्र यायला हवं. महाराष्ट्राची ही अवस्था पाहून ज्याच्या काळजाला घरघर लागली असेल ते सगळे एकत्र येतील. मुंबई व महाराष्ट्रासाठी एकत्र येतील, असे राऊत यांनी म्हटले.
हाच प्रश्न आम्ही काही मनसे नेत्यांना विचारण्यात आला. तेव्हा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत थेट टोला लगावला आहे. मनोमिलनाबाबत उद्धव ठाकरेंचा या आधीचा अनुभव चांगला नसल्याची आठवण त्यांनी करुन दिली. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा याआधीही प्रयत्न केला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना होल्डवरच ठेवणं पसंत केलंय.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंची उद्धव यांच्यावर टीका
या निवडणुकीच्या प्रचारातही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. एकनाथ शिंदे आणि 40 आमदार नाही तर उद्धव ठाकरेच गद्दार आहेत असं राज बोलले आणि एकत्र चर्चेची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. मात्र, आता निवडणुकीचा निकाल लागलाय यात उद्धव ठाकरेंचा ग्राफही खूप खाली आलाय. 20 आमदार कसेबसे निवडून आले आहेत, त्यातले ७-८ तर मनसेमुळे आले आहेत.मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु एकत्र आले तर त्याचा आगामी बीएमसी निवडणुकीत दोघांनाही फायदा होईल का, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय.
आणखी वाचा
Uddhav Thackeray: एक है तो सेफ है! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राजकीय विश्लेषकांचं मत काय?