पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
हार्वेस्टर आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यावर आली पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेत, मात्र खरेदी रखडल्याचं चित्र आहे.
Bhandara: राज्यात शेतमालांच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये आधीच रोष असताना आता धानखरेदी रखडल्यानं व्यापाऱ्यांकडून धानखरेदीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचं चित्र आहे.धानाचे कोठार अशी ओळख असणाऱ्या विदर्भातील भंडाऱ्यात अद्याप धान खरेदी अद्याप रखडल्यानं उत्पादकांना अत्यंत कमी दरात धान विकावं लागत आहे. धानखरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून हार्वेस्टर आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी आता शेतकऱ्यांना पत्नीचं मंगळसुत्र गहाण ठेवायची पाळी आली आहे. दरवर्षी रब्बी हंगामात धान उत्पादकतेच्या आधारावर धान खरेदी केली जाते. यंदा मात्र दिवाळी उलटून गेली तरी धानखरेदी रखडली आहे. त्यामुळे सरकार खुर्चीच्या नादात,शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक
काही बोटावर मोजण्याइतपत शासकीय धान खरेदी केंद्र सोडल्यास अनेक धान खरेदी केंद्रावर अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. परिणामी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून केवळ पंधराशे ते सोळाशे रुपये धानाला प्रति क्विंटल दर देऊन त्यांची आर्थिक अडवणूक करीत असल्याचं चित्र भंडाऱ्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता हार्वेस्टरचे पैसे आणि मजुरांचेही पैसे देण्याचं आर्थिक संकट घोंगावत आहे.परिणामी, शेतकऱ्यावर आता पत्नीचं मंगळसूत्र सावकाराकडं गहाण ठेवण्याचा प्रसंग ओढवल्याचं वास्तव समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या धनाची खरेदी रखडली
दिवाळीपूर्वी सुरू व्हायचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र भंडारा जिल्ह्यात 190 केंद्र कागदोपत्री सुरू झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या धनाची खरेदी सुरू झालेली नाही. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना 2300 रुपये हमी भाव मिळतो. मात्र, अनेक आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत, तिथं केवळ शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असल्यानं याचा गौरफायदा खासगी व्यापारी घेताना दिसत आहेत. धान खरेदी केंद्र सुरू नं झाल्यानं मळणी झालेलं धान शेतात किंवा घरी ठेवावं लागत आहे. राज्य सरकार सध्या खुर्चीच्या नादात दिसून येत असून शेतकरी मात्र, कर्जाच्या ओझ्याखाली सापडल्याचं चित्र आहे.