(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : “त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणले”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde : सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले.
परभणी : आज परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dar) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणले, म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,"विरोधकांनी त्यांच्यावर किंवा आमच्यावर टीका करण्याशिवाय एकही विधायक सूचना आजवर केलेली नाही. त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यांचा भोंगा कायम वाईट बोलण्यासाठी वाजतो तो कधीही काही चांगले सांगत नाही. राज्यात होत असलेले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते फक्त टीका करत सुटले आहेत. सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत,”असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'शासन आपल्यादारी कार्यक्रम' आज परभणी जिल्ह्यात पार पडला. यावेळी परभणी जिल्ह्यातील साडे आठ लाख लाभार्थ्यांना 1500 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे आणि स्वातंत्र्यसैनिक पत्नी गयाबाई रेंगे यांना सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागू नयेत यासाठी 'शासन आपल्या दारी' हा अत्यंत लोकाभिमुख कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणार...
यावेळी पुढे बोलताना, देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकताच त्यांनी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना ज्या पद्धतीने प्रोत्साहित केले ते कौतुकास्पद आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहाय्यानेच मराठवाडा वॉटर ग्रीड किंवा पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणे असे प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. राज्यातील महिलांच्या बचत गटांना बळ देऊन त्यांना शक्तीगट बनवण्याचा निर्णय सरकार घेणार आहे, असं मुख्यंमत्री शिंदे म्हणाले.
परभणीला एवढा निधी मिळाला?
परभणी शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजनेतून 400 कोटींची गरज आहे. रस्ते सुधारण्यासाठी 70 कोटी 21 लाख रुपयांचा जो निधी मंजूर झाला आहे त्यातून कामे सुरू होतील. शेलू तालुक्यातील एमआयडिसीसाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करूनच जमीन अधिग्रहण केले जाईल आणि नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना यासाठी नक्की निधी कमी पडू देणार नाही असेही शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: