Chitra Wagh On Urfi Javed: जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार; चित्रा वाघ कडाडल्या
Chitra Wagh On Urfi Javed: उर्फी जावेदवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्ण कपडे परिधान करेपर्यंत संघर्ष करणार असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले.
Chitra Wagh On Urfi Javed: भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदविरोधातील (Urfi Javed) आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्ण कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले. एका विकृतीविरोधात बोलले तर माझ्याविरोधात सगळे एकत्र येतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी तोकडे, अश्लील कपडे परिधान करत असल्याचा आरोप करत अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीवर कारवाई करण्यासाठी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. तर, दुसरीकडे उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर सोशल मीडियावर उपरोधिक टीका केली. त्यामुळे या दोघींमधील वाद चांगलाच पेटला आहे.
परभणीत दौऱ्यावर आलेल्या भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधातील लढा सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, एका विकृतीविरोधात मी बोलले तर माझ्या विरोधात सगळे एकत्र झाले. माझ्या मुलांचे फोटोदेखील व्हायरल केले. कुणाला काय करायचे ते करू द्या. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम असून तिला अटक होऊन तिच्यावर कारवाई होऊन जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले.
राज्यात अशा प्रकारे ही विकृती उघडे नागडे फिरते आणि मी याबाबत आवाज उठवला तर काय चूक केले असा सवाल त्यांनी केला. कुणात किती हिम्मत आहे, तेवढ्या हिमतीने माझ्या विरोधात बोलावं आणि काम करावं. मी सर्वांना पुरून उरेल असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
महिला अत्याचारांबाबत चर्चा
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज परभणी दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन महिला अत्याचाराबाबतच्या घटनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी उर्फी बाबत अतिशय आक्रमक पणे आपले मत मांडले
उर्फीने पोलिसांकडे नोंदवला जबाब
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदविरोधात तक्रार केली होती. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज आंबोली पोलीस ठाण्यात हजर राहून उर्फीने जबाब नोंदवताना आपली बाजू मांडली.