Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब
Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे.
Urfi Javed: भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याशी सुरू असलेल्या वादावरून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आज मुंबईत आंबोली पोलिसांकडे (Amboli Police) आपला जबाब नोंदवला. आपल्या जबाबात उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर पापाराझींवर फोडले आहे. कामाच्या गरजेनुसार मी कपडे परिधान करते आणि काही लोक माझे फोटो काढतात. हेच फोटो व्हायरल होतात. व्हायरल होणारे फोटो मी कसे काय थांबवू शकते, असे उर्फीने आपल्या जबाबात म्हटले आहे.
तोकडे कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. तर, वाघ यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला उर्फी जावेदने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर या वादाचे जोरदार पडसाद उमटले.
आज उर्फी जावेदने मुंबईतील आंबोली पोलिसांमध्ये जबाब नोंदवला. आपल्या जबाबात उर्फीने म्हटले की, मी भारताची नागरीक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे परिधान करते, ते माझ्या आवडीने परिधान करते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नसल्याचेही उर्फीने म्हटले.
पुढे तिने म्हटले की, मी परिधान करत असलेले कपडे हे माझ्या कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यावरून माझं फोटोशूट होत असतात. माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. हेच फोटो व्हायरल होतात. हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू असा उलट सवालच तिने केला.
चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची नोटीस
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई (Mumbai) पोलिसांनी दखल घेत उर्फीला नोटीस बजावली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली होती. उर्फीला आज हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी माँ, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. त्याशिवाय उर्फी ही मॉडेलिंगमध्ये कार्यरत आहे.