नवी मुंबई APMC शौचालय घोटाळ्याप्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
Navi Mumbai APMC Scam : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरेंना (Sanjay Pansare) अटक करण्यात आलीय. एपीएमसीतल्या सात कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणात (Navi Mumbai APMC Scam) नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. संजय पानसरेंसह 7 अधिकाऱ्यांचा अटकपू्र्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसीच्या नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता, ती डावलून आपल्या मर्जीतल्या संस्थांना वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शौचालयाचे टेंडर दिल्याचा आरोप संजय पानसरेंवर आहे. या प्रकरणात सात कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर सात संचालकांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पानसरे यांना या प्रकरणी नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने बूधवारी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने शशिकांत शिंदे, रवींद्र पाटील, सीताराम कावरखे, जीएम वाकडे, विजय शिंगाडे, सुदर्शन पांडुरंग भोजनकर, राजेंद्र झुंजारराव, विलास पवार या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शशिकांत शिंदे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. इतरांचा जामीन मात्र फेटाळला आहे.
वाशी एपीएमसीमध्ये गाळ्यांच्या विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप
वाशी एपीएमसी मार्केट मधील एक हजार स्क्वेअर फुटचे गाळे अवघ्या पाच लाख रुपयाला विकून सुमारे चार हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप साताऱ्यातील कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. महेश शिंदे यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा खळबळजनक आरोप केला आहे. याबाबत महेश शिंदे यांनी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या आदेशाची कागदपत्रेही सादर केली.
रडीचा डाव केला जात आहे
महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, महविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे विरोधकांकडून रडीचा डाव केला जात आहे. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर यामध्ये मी दोषी आढळलो, तर मी माझा उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
ही बातमी वाचा: