Manda Mhatre : तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्ला, बेलापुरात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
भर सभेत आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईचे माजी महापौर संदीप नाईक यांना दम दिला आहे. माझ्या नादाला कुणी लागलं तर त्याचा नाद खुळा केल्याशिवाय राहणार नाही असं त्या म्हणाल्या.
नवी मुंबई : तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? असा दम भाजपच्या नवी मुंबईतील बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे ( Manda Mhatre ) यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि नवी मुंबई मनपाचे माजी महापौर संदीप नाईक ( Sandeep Naik ) यांना दिला. यावर विरोधक बोलत राहतील, मी कीम करत राहणार, असा पलटवार संदीप नाईक यांनी केला. मात्र या टीका टीपणीमुळे नवी मुंबई भाजपात (Navi Mumbai BJP Politics) सर्व काही सुरळीत नसल्याचं स्पष्ट होतंय.
नवी मुंबईतील भाजपा नेत्यांचा वाद आता विकोपाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
माझ्या नादाला लागाल तर नाद खुळा केल्याशिवाय राहणार नाही
बेलापूर विधानसभेत (Belapur Assembly Election) सध्या भाजपकडून मंदा म्हात्रे आमदार आहेत. यानंतरही संदीप नाईक यांनी याच विधानसभेत कार्यालयाचे उद्घाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे. हाच धागा पकडत आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना सज्जड दम दिला. ‘तुझ्या बापाला हरवले आहे तू कोण?' असा उल्लेख भर भाषणात केला. माझ्या नादाला कुणी लागलं तर त्याचा नाद खुळा केल्याशिवाय राहत नाही असंही त्या म्हणाल्या.
मंदा म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याला उत्तर देताना विरोधक किती ही बोलू देत, आपण काम करत राहणार असा पलटवार संदीप नाईक यांनी केला.
मंदा म्हात्रे पोलीस आयुक्तांच्या भेटीला
दरम्यान, नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील नवविवाहित महिलेवर शिळफाटा भागात चार आरोपींनी सामूहिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली होती. पुजारी म्हणून वावरणाऱ्या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींना अटक केली असली तरी ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर यांची चार्जशिट दाखल करण्याची मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेत मंदा म्हात्रे यांनी ही मागणी केली आहे. नवी मुंबई शहरात गुन्हेगारी वाढली असून ती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस संख्याबळ वाढवण्यात यावे अशाही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: