Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
Maharashtra Assembly Elections 2024 : स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजेंची सभा पार पडली.
नाशिक : कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू झालंय, असे म्हणत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला. स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे (Nashik West Assembly Constituency) उमेदवार दशरथ पाटील (Dashrath Patil) यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजेंची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आज जे राजकारण सुरू आहे ते आजवर कधीच बघितले नाही. खोके, गद्दारी बेईमानी सुरु आहे. माझा शिवसेना पक्षाची कधीही काँग्रेसशी युती करणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे बोलत होते. मग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत कसे गेले? खुर्चीसाठी तुम्ही तिथे गेले. मग ही गद्दारी नाही का? असा त्यांनी उपस्थित केला.
कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी 70 हजार कोटींचा आरोप करत होते. आज त्याच अजित पवारांसोबत सरकार आहे. सोनिया गांधी यांच्या परदेशीचा मुद्दा घेऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, नंतर पुन्हा त्यांच्यासोबत गेले. कारल्याच्या भाजीसारखे राजकारण कडू झाले आहे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी सर्वांवर हल्ला चढवला.
प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण तसे आपण वागतात का? आमच्याकडं शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार आहे. 20/25 वर्षांची घराणेशाही आहे. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र तलवार होती. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं 'पेन'च शस्त्र आपल्यासोबत आहे. महात्मा फुलेंची सामाजिक रचना, बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि या 'पेन'च्या शाईमधून शिवाजी महाराजांच्या विचार लिहिले जातात. महाराष्ट्र इतरांना दिशा देणारं राष्ट्र आहे. पण, या सर्व प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला. तो सदाभाऊ खोत काहीही बोलतो, त्याला उत्तर देणारा तो कुत्रा आहे म्हणतो, हा प्रचार आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. महायुती 1500 रुपये रुपये देतात, महाविकास आघाडीवाले म्हणतात 3 हजार देतो, त्यापेक्षा या महिलांना रोजगार द्या, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
इतर महत्त्वाच्या बातम्या