सरपंचाने दागिने गहाण ठेवून कर्मचाऱ्यांना पगार दिला
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 125 नुसार घरपट्टी द्यायची की सुधारित कलम 124 नुसार द्यायची याबाबतचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत सापडली आहे.
नाशिक : नाशिकमधील एकलहरे गावाच्या महिला सरपंचाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी स्वत:चे दागिने गहाण ठेवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पाची तीन कोटीची थकबाकी असल्यानं ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांपासूनचा पगार रखडला आहे.
औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे एकलहरे गावाला वेगळी ओळख मिळाली. लोकांच्या घरात वीज पुरवठा करणाऱ्या ह्या प्रकल्पामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मात्र अंधकार झाला. ग्रामपंचायतीचा आर्थिक गाडा प्रकल्पाच्या मिळणाऱ्या घरपट्टीवर अवलंबून आहे. मात्र विद्युत प्रकल्पाने जवळपास तीन कोटी रुपयाची घरपट्टी थकावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची तिजोरी रिकामी आहे आणि कर्मचाऱ्यांचं वेतनही थकलं आहे.शासनाकडूनही निधी उपलब्ध होत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला. मात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी सुखात पार पडावी यासाठी एकलहरे गावच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी पुढाकार घेत स्वत:चे दागिने गहाण ठेवून एक लाख 74 हजार रुपये जमा केले आणि त्यातून सात कर्मचाऱ्यांचा पगार दिला.
मोहिनी जाधव कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या वेळी धावून आल्या. मात्र मोहिनी जाधव यांच्यासारखी लोकं शासनाची जबाबदारी प्रत्येकवेळी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 125 नुसार घरपट्टी द्यायची की सुधारित कलम 124 नुसार द्यायची याबाबतचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत सापडली असून शासनाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.