प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री पाटील यांच्या हस्ते संघातील करवीर निवासिनी अंबाबाई तथा भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व पेंडसे शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले
कोल्हापूर : धर्म म्हणजे काय? जन्मापासून ते मृत्यपर्यंतचे सर्व विधी का व कशासाठी? त्यामागील तत्वज्ञान काय? आदी बाबी सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगितल्या तर आपली संस्कृती आणखी समृद्ध होईल, असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. तसेच यज्ञयाग, वेदमंत्रांचे पठण आदींद्वारे आपल्याला मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा लाभते असेही त्यांनी नमूद केले. संघाच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील धर्मसाहित्य मराठीमध्ये आणून त्याचे मर्म समाजापर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या मुख्य कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री पाटील यांच्या हस्ते संघातील करवीर निवासिनी अंबाबाई तथा भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व पेंडसे शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी महालक्ष्मी वेद वेदांग पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांचे पठण केले. चंद्रकांत पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते संघाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. उपाध्यक्ष सचिन पितांबरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर अमोघ भागवत यांनी प्रास्ताविक केले.
संघाचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांनी संघ स्थापनेचा उद्देश, संघाने वेद वेदांग पाठशाळेच्या माध्यमातून आजपर्यंत घडवलेले विद्यार्थी, संघाचे समाजातील सर्व घटकांसाठीचे कार्य याची माहिती दिली. चारही वेद, स्तोत्रवर्ग, उपनिषदे, ज्योतिषशास्त्र आदी विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवत असल्याचे सांगितले. तसेच प्राचीन कोल्हापुरात वेद - वेदांतशास्त्राला राजाश्रय होता. तसाच राजाश्रय मंत्री महोदयांच्या नेतृत्वात पुन्हा प्राप्त व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. अध्यक्ष निगुडकर यांनी शाल, पुणेरी पगडी व मानपत्र देऊन चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले, आभार विशाल जोशी यांनी मानले. यावेळी संघाचे सचिव निलेश कुलकर्णी, नरेंद्र खासबारदार, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, श्रीकांत लिमये, विनोद डिग्रजकर, राजू मेवेकरी सर्व संचालक व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
हेही वाचा
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला