Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
Maharashtra Politics: छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि भुजबळ यांच्यातील संवाद चर्चेचा विषय ठरला होता.
मुंबई: पुण्यात अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी व्यासपीठावर असताना अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कागदावर लिहून दिलेला मजकूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. याविषयी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी तुम्हाला कार्यक्रम पुत्रिकेवर नेमके काय लिहून दिले, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर छगन भुजबळांनी,'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ' असे बोलत शरद पवारांनी दिलेल्या संदेशाबाबत बोलणे टाळले. परंतु, छगन भुजबळांच्या या गूढ वक्तव्याने याप्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.
या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदाबाबतही विचारणा करण्यात आली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून सातत्याने आम्ही भुजबळ साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सांगितले जात आहे. तुमची खरचं मनधरणी केली जात आहे का, असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, माझी कोणाशीही भेट झालेली नाही किंवा चर्चा झालेली नाही. मला यावर काही बोलायचे नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल मीडियामोर तुमच्या मनधरणीची भाषा करुन तुमच्या भावनांशी खेळत आहेत का, असा प्रश्नही भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी, 'माझ्या सर्व भावना आता मेल्या आहेत', असे म्हटले. आता मी तुमच्यासोबत बसतो आणि पुढे काय करायचे, हे ठरवतो, अशी मिश्कील टिप्पणीही भुजबळ यांनी केली.
अजित पवारांनी अलीकडेच एक वक्तव्य केले होते. 'तुम्ही मला मतं दिलीत म्हणजे तुम्ही माझे मालक किंवा मी तुमचा मजूर झालेलो नाही.' याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ठीक आहे, त्यांनी एवढं बोलायला नको पाहिजे होते. जनता ही मंत्र्यांची मालक असते की नाही, मुद्दा नसतो. जनता राज्याची मालक आहे, देशाची मालक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला देशाचं मालक बनवलं आहे, तिथे आमची काय बिशाद, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि छगन भुजबळ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. हे दोन्ही नेते आजुबाजूला बसले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कार्यक्रम पत्रिकेवर काहीतरी मजकूर दिला आणि ही कार्यक्रमपत्रिका भुजबळांच्या हातात दिली. छगन भुजबळांनी हा संवाद वाचला. त्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलत होते आणि हसू लागले. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलत होते, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
आणखी वाचा
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला