नाशकात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांचा 'मनसे' उपक्रम; पेट्रोल दर निम्म्यावर
देशात इंधनदरवाढीचं सत्र सध्या सुरुच आहे. अशातच नाशकात राज ठाकरेंच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल देण्याचा उपक्रम मनसैनिकांनी हाती घेतला आहे.
नाशिक : देशात इंधनदरवाढीचं सत्र सध्या सुरुच आहे. अशातच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत तर पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. अशातच मनसेच्या वतीनं राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने 53 रुपयांत एक लीटर पेट्रोल दिलं जात आहे.
नाशिक शहरात आज पेट्रोलचा दर 103 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 93 रुपये 65 पैसे आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी वाहनचलकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्तानं डोंबिवलीत 1 रुपयांत पेट्रोल विक्री करण्यात आली होती. तर आज 53 रुपयांत पेट्रोल विक्री सुरु असल्यानं नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं डोबिंवलीत 1 रुपये प्रति लिटर पेट्रोल
इंधनाचे अवाक्याबाहेर गेलेले दर पाहता आता सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्यात येत असून, हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने म्हणजेच, 13 जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयांत एक लिटर या प्रमाणानं पेट्रोल विकण्यात आलं होतं.
निर्धारित कालावधीत येणाऱ्या ग्राहकांनाच 1 रुपयांत एक लिटर पेट्रोल देण्यात आलं. कल्याण युवासेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत 1 रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर अंबरनाथमध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अंबरनाथ पश्चिमेकडील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी 50 रुपये लिटरने पेट्रोल देण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका; गेल्या एका महिन्यापासून सतत इंधन दरवाढ
नांदेड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. गेल्या एका महिन्यात पट्रोल 7 रुपये 87 पैसे तर डिझेल दरात 6 रुपये 47 पैसे एवढी दरवाढ झाली आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल दर 104 रुपये 87 पैसे तर डिझेल 95 रुपये 87 पैसे दर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :