नाशिकमधील 1324 शाळा 100 टक्के सुरु करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्याने शाळामध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम सुरु झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु होणार आहे. त्यामुळे कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोविड विषाणूच्या अनुषंगाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्षपणे सुरु करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकातील सूचनांच्या अधिन राहून शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वरील वर्ग सुरळीतपणे सुरु करण्यासाठी महानगरपालिका हद्द वगळून उर्वरित नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी (शिक्षण) सुनीता धनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांच्या अँटीजन तपासण्या करणे अनिवार्य असून काही प्रमाणात लक्षणे असलेल्या शिक्षणकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी. शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता, नियमित सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या गोष्टी पालन करण्यात याव्यात. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरु होणार असल्याने या भागातही कोविडबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल. यासाठी नोडल अधिकारी आणि सर्व संबंधित शाळांनी लक्ष देणे आवश्यक आहे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.
शाळा सुरु होण्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय प्रत्यक्षपणे शिकवण्यात येणार असून उर्वरित विषय ऑनलाईन पद्धतीनेच शिकवण्यात येणार आहेत. याचसोबत पालकांच्या मागणीनुसार वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी आवश्यकतेनुसार परिवहन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. शाळा सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणामार्फत यथोचित सहकार्य करण्यात येणार आहे.