Nashik News : कुणाचं कुटुंब गेलं, तर कुणाची सून गेली, तर कुणाचं भविष्यच उध्वस्त झालं, समृद्धी महामार्गावरच्या अपघातानं सारंच हिरावलं!
Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झालेल्या अपघातांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
नाशिक : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झालेलया अपघातांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोणाचं कुटुंब उध्वस्त झालं, तर कुणी पोरकं झालं, तर कुणाचं भविष्यच उध्वस्त झाल्याचं या अपघाताने समोर आणलं. नाशिक जिल्ह्यातील अकरा प्रवाशांवर काळाने घाला घातला असून संबंधित कुटुंबियांच्या घरी नुसता हंबरडा ऐकू येत असून कोणत्याच घरी चूल पेटली नसल्याचे वास्तव आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील (Vaijapur) जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले. दरम्यान मृतांमध्ये एक वैजापूर तर अन्य अकरा मृत हे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. जेव्हा या घटनेची माहिती संबंधित कुटुंबियांना मिळाली, तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. या अपघातात अनेक कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असून नाशिकमधील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळल्याचे चित्र आहे.
दरम्यान या अपघातात नाशिक शहरातील (Nashik Accident) समतानगर, राजूनगर, गौळाणेसह निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, पिंपळगाव बसवंत येथील मृतांचा समावेश आहे. समतानगर परिसरात राहणाऱ्या सोळसे कुटुंबातील लखन सोळसे हे आपली पत्नी काजल, 5 वर्षांची मुलगी तनुश्री आणि दोन मुलांसह बुलढाण्याजवळील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असतांनाच पत्नी काजल आणि 5 वर्षांची मुलगी तनुश्रीवर काळाने घाला घातला. तर शहरातील राजुनगर भागातील गांगुर्डे कुटुंबीयच मृत पावलं आहे. झुंबर काशिनाथ गांगुर्डे, अमोल झुंबर गांगुर्डे, सारिका झुंबर गांगुर्डे यांचा समावेश आहे. तर राजूनगर येथीलच पंजाबी रमेश जगताप यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. यानंतर निफाड तालुक्यातील संगीता विलास अस्वले (वनसगाव), हौसाबाई आनंदा शिरसाट (उगाव), मिलिंद हिरामण पगारे (कोकणगाव), दीपक प्रभाकर केकाने (बसवंत पिंपळगाव) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गौळाणे येथील रजनी गौतम तपासे यांचाही समावेश आहे. एकूणच या अपघातात मायलेकी, एक कुटुंब व अन्य कुटुंबातील एक-एक सदस्य जीवाला मुकला आहे.
कसा घडला नेमका अपघात?
बुलढाण्याहून Buldhana) वैजापूर मार्गे निघालेल्या या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. यावेळी जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. यामुळे ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळायच्या आत ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसून आलं. मात्र या अपघातात पुन्हा एकदा बारा निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे.
इतर महत्वाची बातमी :