Nashik News : आला आला उन्हाळा! शीतपेय पिताना तपासून घ्या, अन्न आणि औषध प्रशासनाचे महत्वाचं आवाहन
Nashik News : आला आला उन्हाळा! शीतपेय पितांना तपासून घ्या, अन्न आणि औषध प्रशासनाचे महत्वाचं आवाहन.
Nashik News : एकीकडे उन्हाचे (Hit) चटके जाणवू लागले असून शरीराला थंडावा देण्यासाठी शीतपेयांकडे (Coldrinks) नाशिककरांची पाऊले वळू लागली आहेत. मात्र अनेकदा शीतपेये किंवा थंडगार सरबत पिल्याने काहीसा दिलासा मिळत असला तरीही तपासून घेणे महत्वाचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नाशिकचे (Nashik) अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
मागील काही दिवसात नाशिक (Nashik) शहरात उन्हाचा कडाका जाणवत असून जवळपास 40 डिग्रीच्या जवळपास असल्याने शितपेय, फळे, आईसक्रीम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्स (Energy Drinks) याची मोठ्याप्रमाणे बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे नाशिककरही मोठ्या उत्साहात थंडपेये, फळे खरेदी करण्यावर भर देत आहेत. याच संदर्भात शीतपेये आणि थंडगार सरबत आदींच्या गुणवत्तेच्या बाबत अन्न व औषध प्रशासनाने ठोस मोहीम हाती घेतलेली आहे. शीतपेयांसाठी वापरण्यात आलेले पदार्थ किंवा पाणी योग्य पद्धतीने हाताळले गेले आहे का किंवा पुरेशी स्वच्छता राखली गेली आहे का, याची तपासणी आता केली जाणार आहे. त्याचा भाग म्हणून पेठरोडवरील शरद पवार मार्केट या ठिकाणी शारदा फ्रुटस कंपनी, येथे अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी तपासणी करून विक्रीसाठी साठविलेल्या आंबा आणि आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे इथिलिन रायपनर सॅचेटसचे नमूने घेण्यात आले.
दरम्यान दुसरा छापा ओझर येथे व्ही. ए. एन. सी. एजन्सी, या ठिकाणी प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी देवरे यांनी धाड टाकुन त्या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेले शितपेय एक थम्सअप, मँगो ड्रिंक्स माझा व स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेवून स्टिंग एनर्जी ड्रिंक्सचे 960 बाटल्या किंमत रुपये 19 हजार 200 इतका जप्त केला. त्यानंतर व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स, मालेगांव या ठिकाणी भेट देवुन फ्रोझन डेझर्ट याचा नमुना घोज विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेला आहे. दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील आकाश एजन्सी, या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी, योगेश देशमुख व सहायक आयुक्त अन्न, विवेक पाटील यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहून स्टिंग कॅफिनेटड बिव्हरेज, थम्सअप चार्ज कॅफिनेटड बिव्हरेज व मॉनस्टर कॅफिनेटेड बिव्हरेज चे नमूने घेऊन त्यांचा साठा एकुण 13 हजार 200 रुपये इतका माल जप्त करण्यात आला.
नाशिककरांच्या आरोग्याची काळजी
नाशिककरांच्या आरोग्याची काळजी घेत शरीरास हानिकारक अशा शीतपेयांची विक्री करणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणार आहे. शीतपेय शरीरास अपायकारक असल्याचे नमुन्यात स्पष्ट झाल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. या प्रकरणी कारवाई करत घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असुन अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान ही धडक मोहिम संपूर्ण उन्हाळाभर अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे.