छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा चटका वाढतोय, उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून सूचना
Heat Wave : सद्याची उन्हाची परिस्थिती पाहता महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
Heat Wave : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत असून, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन (जलशुष्कता) मुळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे सद्याची उन्हाची परिस्थिती पाहता महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
उष्माघात होण्याची कारणे
- प्रखर उन्हात शारीरिक श्रमाची आणि अंग मेहनतीची व कष्टाची कामे करणे
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे
- काच कारखान्यात काम करणे
- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे
- घट्ट कपडयाचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होवू शकतो.
उष्माघाताची लक्षणे
मळमळ, उलटी, हातपायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सीअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे. डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, हाता पायात गोळे येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी अस्वस्थता, बेशुध्दावस्था इ. अतिजोखमीच्या व्यक्ती तसेच बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणा-या व्यक्ति, वयस्कर व्यक्ति ज्यांना हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मुत्रापिंडाचे विकार
उष्माघातासाठी प्रतिबंधक उपाय
- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे
- शक्य नसल्यास थोडया वेळाने सावलीत विश्रांती घेवून पुन्हा काम करावे
- कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत.
- उष्णाता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे ) वापरु नये.
- सैल, पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावे.
- तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे.
- बाहेर प्रवासाला जातांना पाणी सोबत ठेवावे.
- पाणी भरपूर प्यावे, डिहायड्रेशन होवू देवू नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा.
- लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळपाणी इ. प्यावेत.
- उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इ. चा वापर करावा.
- घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, ऐअर कंडिशनर्स, वाळयाचे पडदे याचा वापर करावा.
- पार्कींग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
- उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्र/रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.
उष्माघातावर त्वरीत उपचार करणे आवश्यक
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमाण खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरीत उपचार सुरु करावे. रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरीत अंग थंडपाण्याने शरीराचे तापमान कमी होई पर्यंत पुसत रहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, ऐअर कंडिशनर्स त्वरीत चालू करावे. रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवणी दयावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा कॉफी देवू नये. तसेच रुग्णाच्या काखेखाली आईसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत रहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावे.
आरोग्य विभागाचे आश्वासन
तसेच रुग्णाने नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात केंद्र/रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा व रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 (Ambulance) साठी कॉल करावा. मनपा मेल्ट्रॉन DCHC रुग्णालय चिकलठाणा येथे उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. तर अधिक माहितीसाठी संपर्क 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 2333536-40 विस्तारीत क्र. 250 खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास मनपाच्या 24 तास साथरोग नियंत्रण कक्षास त्वरीत कळवून सहकार्य करावे. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, डॉ. अर्चना राणे साथरोग आरोग्य अधिकारी, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Heat Anxiety: उष्णतेमुळे सतत घाम येतो, मग तुम्हाला असू शकतो हिट एंग्जायटीचा त्रास