Coca-Cola : कोका-कोलामध्ये खरंच कोकेन होतं? औषध ते शीतपेय असा प्रवास करणाऱ्या कंपनीचा रंजक इतिहास
Coca-Cola History : कोका-कोलाची सुरुवात एक औषध म्हणून झाली होती. कोका-कोलामध्ये खरंच सुरुवातीच्या काळात कोकेन होतं का? जाणून घ्या कोका-कोलाचा रंजक इतिहास
Coca-Cola History : जगातील श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक असणारे एलन मस्क यांनी ट्वीटरवर आता कोका-कोला कंपनी खरेदी करणार असल्याचे ट्वीट गंमतीने केले. कोका-कोला कंपनी खरेदी करणार असून त्यामध्ये पूर्वीप्रमाणे कोकेनचा समावेश करणार असल्याचे म्हटले. मस्क यांच्या या ट्वीटनंतर कोका-कोलामध्ये खरंच कोकेन होतं का, असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. कोका-कोलाचा फॉर्म्युला नेमका काय, कोका-कोला या नावातलं कोका म्हणजे काय असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालेत.
औषध ते शीतपेय असा प्रवास कोका-कोलाने केला आहे. 1886मध्ये स्थापन झालेल्या ही कंपनी आज जगातील आघाडीची शीतपेय विक्री करणारी कंपनी आहे. जगातील जवळपास 200 देशांमध्ये कोका-कोलाची विक्री होते. भारतासह काही देशांमधील बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक शीतपेय कंपन्यांचे अधिग्रहण केले असल्याच्या काही घटना आहेत.
कोका-कोला कंपनीचा इतिहास काय?
वर्ष 1885 मध्ये अमेरिकेतील जॉर्जिया येथील फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन यांनी कोका-कोलाचा शोध लावला होता. कोका-कोला तयार करण्याचा फॉर्म्युला हा त्यांनी घराच्या अंगणात तयार केला होता. हा फॉर्म्युला अद्यापही कोणाला माहीत नाही. असं म्हणतात की हा ऐतिहासिक फॉर्म्युला कंपनीच्या मुख्यालयातील तिजोरीत जपून ठेवण्यात आला आहे.
कोका-कोलामधील कोका म्हणजे काय?
पेम्बर्टन यांनी कोला तयार करताना कोकाच्या पानाचा वापर केला. कोकाच्या पानाच्या अर्काच्या स्वरूपात कोकेन होते. याच कोकेनच्या नावातील कोका आणि कोला म्हणजे कोला नट यामध्ये कॅफीन हा उत्तेजक पदार्थ असतो. यातून कोका-कोला असे शीतपेय तयार केला. कोका-कोलाची निर्मिती झाली तेव्हा कोकेनचे सेवन करणे कायदेशीर होते. काही औषधांमध्ये कोकेन हा महत्त्वाचा घटक होता. कोकेनच्या अत्यल्प प्रमाणातील सेवनाने आजारातून बरं होत असल्याची लोकांमध्ये भावना होती.
औषध म्हणून कोका-कोलाचा वापर?
ब्रेन टॉनिक आणि बौद्धिक पेय म्हणून पेम्बर्टनने या पेयाचे वर्णन केले होते. जाहिरात करताना 'पेटंट औषध' म्हणून केले. कोका-कोला सेवनाने डोकेदुखी, पोटदुखी आणि थकवा बरा होता असाही दावा करण्यात आला होता.
19 व्या शतकात पेटंट औषधांचे नियमन केले जात नव्हते. त्यामुळे औषधांची संबंधित औषधाची परिणामकता आणि परिणाम हे तपासले जात नव्हते. त्यामुळे संबंधित औषधांच्या फायद्याबाबत विविध दावे केले जात असे.
कोका-कोलामधून कोकेनची 'एक्झिट'
कोका-कोलामधील कोकेनचे प्रमाण कालांतराने कमी करण्यात आले, आणि शेवटी 1929 पर्यंत पेयातून काढून टाकण्यात आले. या काळात अमेरिकेत मद्याला बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. त्यामुळे हार्ड ड्रिंकला पर्याय म्हणून सॉफ्ट ड्रिंक असलेल्या कोका-कोला चांगलाच लोकप्रिय झाला.