अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे संकेत सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना दिले होते.
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकांना समोरे जात आहेत. महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, या प्रश्नावर मात्र महायुतीचे नेते उत्तर देण्याचं टाळतात. मात्र, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेंला सुरुवात केली आहे. त्यात, सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात भाषण करताना अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत तेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. अमित शाह (Amit Shah) यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही महायुती म्हणून याबाबत एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर, महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झालेला नसताना अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांच्या संकेत दिले, याबाबत विचारले असता त्यांना तो अधिकार आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान, प्रफुल पटेल यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे संकेत सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना दिले होते. त्यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारले असता, मी इथे बसून महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे ठरवू शकत नाही, निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षाच्या संख्येच्या आधारावर व संमतीने मुख्यमंत्रीपदाचा विषय ठरवणार आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जावं, असं महायुतीमध्ये ठरलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली. तर, अजित पवार यांनीही, अमित शाहांना भाषणात बोलायचा अधिकार आहे, असे म्हटले. त्यामुळे, महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र, महायुतीमधील तिन्ही पक्षांची स्पर्धा असल्याचे दिसून येते.
काय म्हणाले अमित शाह
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे यादिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. त्यावरुन, आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळांनी तसं म्हटलंच नाही
राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात लिहिलेलं वक्तव्य भुजबळ यांचं नाही. मी सकाळीच भुजबळ साहेबांशी बोललो आहे. ते म्हणाले मी अजिबात असं बोललो नाही, असेही पटेल यांनी सांगितले. राजदीप सरदेसाई यांच्या 'द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यात भुजबळांनी ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो असं म्हटलं. त्यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता, "अधिकृतपणे सांगू इच्छितो की, राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातलं अधिकृत वक्तव्य छगन भुजबळ यांचं नाही. मी सकाळीच त्यांना विचारलं ते म्हणाले मी अजिबात असं काही बोललो नाही. या विषयावर मी कायद्याच्याद्वारे जे कारवाई करता येईल ते करणार" असल्याचंही त्यांनी मला सांगितल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.
हेही वाचा
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल