Nashik Citylink Bus : नाशिकच्या सिटीलिंकची वर्षपूर्ती, वर्षभरात 96 लाख किमीचा प्रवास म्हणजेच पृथ्वीपासून सूर्याला मारलेल्या तीन फेऱ्या एवढा!
Nashik Citylink Bus : नाशिक (Nashik) महापालिकेने वर्षभरापूर्वी सुरु केलेली सिटिलिंक (Citylink) बससेवेने 96 लाख किमीचा प्रवास केला असून जवळपास 01 कोटी 63 लाख प्रवाशांना सेवा दिली आहे.
Nashik Citylink Bus : नाशिक (Nashik) महापालिकेने वर्षभरापूर्वी सिटिलिंक (Nashik Citylink) अंतर्गत सुरु केलेली बससेवा नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी सुरु केलेल्या या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वर्षभरात तब्बल एक कोटी 63 लाख प्रवाशांनी सिटीलिंकद्वारे प्रवास केला आहे. तर 96 लाख किमीचा प्रवास म्हणजेच पृथ्वीपासून सूर्याला मारलेल्या तीन फेऱ्या एवढा असल्याचे सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र एवढा चागंला प्रतिसाद मिळूनही सिटीलिंक तोट्यात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक महापालिकेने 08जुलै 2021 रोजी शहरात सिटीलिंक बससेवेचा शुभारंभ केला. कोरोनाकाळात सुरु झालेली बससेवा क्ती तग धरेल याबाबत सर्वांनाच शंका होती. मात्र वर्षभरातल्या आढावा बघितला तर सिटी लिंक प्रचंड वेगाने धावत आहे. सुरवातीला केवळ शहरासाठी मर्यादित असलेली हि सेवा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातदेखील विस्तारत गेली. आजच्या घडीला त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सिन्नर, पिंपळगाव बसवंत, भगूर, गिरणारे, कसबे सुकेणे आदी गावापर्यंत सिटी लिंक बससेवा जोडली गेली आहे.
दरम्यान नाशिक शहराच्या जवळ असणाऱ्या सिन्नर, त्र्यंबकेश्वर आदी शहरात आधीपासून एसटी महामंडळाच्या बसेस होत्या. त्यामुळे येथे सिटीलिंक बससेवा उभारी घेईल का अशी शंका होती, मात्र सिटीलिंक बससेवा या मार्गावरही सुसाट असल्याचे दिसते. सध्या 46 मार्गावरून सिटीलिंक धावत असून दररोज सरासरी 45 हजार किमीचा प्रवास करीत दैनंदिन 80 हजार प्रवाशांना सेवा देत आहेत. यातून सरासरी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सिटीलिंकच्या ताफ्यात सद्यस्थितीत 163 सीएनजी, 43 डीझेल अशा एकूण 206 बसेस धावत असून 510 वाहक व 510 चालक सेवा बजावत आहेत.
सिटी लिंकची वर्षपूर्ती
सद्यस्थितीत सिटीलिंकच्या 206 बसेसद्वारे सेवा देण्याचे काम सुरु आहे. वर्षभरात तब्बल 01 कोटी 63 लाख 46 हजार 765 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर 96 लाख 70 हजार 159 किमीचा प्रवास झाला असून या माध्यमातून जवळपास 38 कोटी 64 लाख 49 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय कर्मचारी वेतन, इंधन व इतर एकूण खर्च 71 कोटी 18 लाख 67 हजार रुपयांचा खर्चही झाला आहे. म्हणजे जवळपास 32 कोटी 54 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
वर्षपूर्तीनिमित्त सिटीलिंकचे वाहतूक व्यवस्थापक मिलिंद बंड म्हणाले कि, गुणवत्तापूर्ण सेवा दिल्यामुळेच सिटीलिंक नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे. प्रवाशांचे हित लक्ष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत एनसीएमसी कार्ड सुविधा देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बसेससाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून या वर्षांअखेर पर्यंत त्या दाखल होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.