(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या, छगन भुजबळ यांचं नांदगावकरांना आवाहन
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना आशीर्वाद द्यावेत, असं आवाहन नांदगावकरांना केलं. ते नांदगाव येथे बोलत होते.
नाशिक : नांदगावमध्ये समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज आणि समीर आता तुम्ही मोठे झाला आहात, आई - वडिलांना मात्र तुम्ही लहानच असतात पण तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला शिका, असा भावनिक वडिलकीचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. ते म्हणाले, समीर भाऊ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात काम करायचं आहे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर, पंकज भाऊ आहेत तुमच्या बरोबर आहोत. कल्पक बुद्धीचे आहात, रात्रंदिवस मेहनत करता, नेहमी बॅक स्टेजला असायचे. आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत. माझे त्यांना आशीर्वाद आहेत. नांदगाव करांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यांना लाभो, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ नाशिकच्या नांदगाव येथे समीर भुजबळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अजय - अतुल यांच्या यांच्या साद स्वरांची संगीत मैफिल या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे.जनतेची सेवा करा, समाजकारण करा आणि त्यातून राजकारण करा जनता नेहमी तुमच्या पाठीशी राहील असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
राजकारण करायचं ते समाजसेवेसाठी : छगन भुजबळ
सामाजिक काम करताना कसं काय काम करायचं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्ट मला विचारण्याची आवश्यकता नाही. सामाजिक काम पुढं नेण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे. गोरगरिबांच्या उपयोगी पडणं हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. राजकारण करायचं आहे ते समाज सेवा करण्यासाठी करायचं आहे हे विसरु नका, असं छगन भुजबळ म्हणाले
तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हे कधी विसरता कामा नये, लोकांना कधीही ओरबाडण्याचं काम करायचं नाही, लोकांना देण्याचं काम करायचं आहे. मुंबई, नाशिक, येवला, नांदगाव सगळा महाराष्ट्र या कामासाठी तुमची वाट पाहत आहे. गरिबांचं काम करायचं हे कधीही विसरु नका, स्वत:चे निर्णय स्वत: घ्या, समाजसेवा करताना काही विचारायचं नाही, तुम्ही स्वत: ला लहान समजू नका, तुम्ही मोठे झाला आहात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
महायुतीचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ हे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे.मंत्री भुजबळ यांनी देखील तसे संकेत काल समीर यांच्या वाढदिवसाच्या ट्विट द्वारे शुभेच्छा देताना दिले होते. त्यामुळे भुजबळांच्या एन्ट्रीची नांदगाव शहरात चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमास सैराट फेम रिंकू राजगुरू उर्फ आर्ची उपस्थित होती..अजय - अतुल यांच्या गाण्याची मैफिल यानिमित्ताने रंगली होती.
इतर बातम्या :