Nanded News : पोलीस भरती झालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
Nanded News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेडमधील कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
Nanded News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नांदेडमधील (Nanded) कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेली पोलीस भरती (Police Recruitment) झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या (Hyderabad Liberation Day) निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.
रखडलेली पोलीस भरती कधी सुरु होणार : विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल
मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपस्थिती केला.
तरुणांवर सौम्य लाठीचार्ज
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना भेटले. पण काहीही न बोलताच ते तिथून निघून गेले.
बेकार आहे, नोकरी मागायला जाणारच ना? : अजित पवार
नांदेडमधील या घटनेवर अजित पवार म्हणाले की, "महागाई प्रचंड वाढलीय, बेरोजगारी वाढतेय. मला आताच निरोप आला की नरेंद्र मोदी यांच्या आय़ुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनांचा उद्घाटन नांदेडमध्ये होत होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नोकरी मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर लाढीचार्ज करण्यात आला. अरे तो बेकार आहे, नोकरी मागायला जाणार ना. आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मला पण सकाळपासून मुलं भेटली आणि म्हणाली की आमच्या नोकरीचं काय. आम्ही पोलीस भरती, शिक्षक भरती काढल्या होत्या. दुर्दैवाने शिक्षक भरतीत भ्रष्टाचार झाल्याने ती थांबवावी लागली. पुढे पुन्हा भरती करायचं ठरवलं पण आमचं सरकार गेलं. आज आपण सरकारमध्ये सगळ्या प्रकारच्या पाऊणे लाखा जागा भरु शकतो."
महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडू पोलीस भरतीची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलीस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2022