दुष्काळाचे सावट! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध; परिस्थिती गंभीर
Nanded Water Storage : नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, सध्या केवळ 28.63 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Nanded Water Storage : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडत नसल्याने चिंता वाढत आहे. दरम्यान नांदेड (Nanded) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम प्रकल्पातील पाणीसाठ्यावर देखील होतोय. पाऊस हुलकावणी देत असल्याने नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्याची (Water Storage) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, सध्या केवळ 28.63 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर परिस्थिती अशीच असल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होऊ शकतो.
यंदा एक महिना उशिराने मान्सून दाखल झाला. त्यामुळे जुन महिना कोरडा गेला. जिल्ह्यात काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असला तरी या पावसात जोर नाही. यामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत. पेरणी केलेली पिके अंकुरली असून, पावसाअभावी धोक्यात आले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होत असल्याने चिंता वाढली आहे. तर सद्यस्थितीला नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 208 दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या केवळ 28 टक्के पाणी शिल्लक आहे.
आतापर्यंत 65 टक्के पाऊस
नांदेड जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागात पाऊस झाला. काही भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. तर जिल्ह्यात आतापर्यंत 65 टक्के पाऊस झाला आहे. 25 टक्के पावसाची तूट कायम आहे. पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर यंदाचं खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. सोबतच ग्रामीण भागात पाणी टंचाई देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता उपस्थित केली जात आहे. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी जोरदार पाऊस...
मागील वर्षी जून आणि जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. काही ठिकाणी तर अतिवृष्टी पाहायला मिळाली. गेल्यावर्षी या वेळी जिल्ह्यातील मोठ्या लहान प्रकल्पांमध्ये मिळून 78.78 टक्के पाणीसाठा जुलै महिन्यामध्ये होता. त्यामुळे एकूण प्रकल्पात एकूण 573 दलघमी पाणी उपलब्ध होते. मात्र सध्या 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील पाणी संकटाची चाहुल जाणवत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: