राज्यभर गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील संशयित आरोपीला शासकीय सेवेत सामावून घेतल्याने खळबळ; काय आहे प्रकरण?
Nanded News : वेणीकर याना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
Nanded News : संपूर्ण राज्यात गाजलेल्या कृष्णुर धान्य घोटाळ्यातील आरोपी आणि नांदेडचे (Nanded) तात्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर (Santosh Venikar) यांची शासनाने पुन्हा पदस्थापना केली आहे. त्यांच्याविरोधात कुंटुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेणीकर बराच काळ अज्ञातवासात होते. 16 जून 2022 रोजी त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र त्यानंतरही आढावा समितीने या प्रकरणाचा आढावा घेऊन त्यांची महसूल खात्यात अकार्यकारी पदावर नेमणूक करण्याची शिफारस केली. त्यानुसार वेणीकर याना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
अनेक गंभीर आरोप असताना देखील शासकीय अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याचे अएंक प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहे. आता पुन्हा एकदा असाच आरोप करण्यात येत आहे. कारण राज्यभरात गाजलेल्या नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि कोरोना काळात जामिनावर सुटलेले संतोष वेणीकर यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन लाभक्षेत्र यवतमाळ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर अटक होण्याच्या भीतीने वेणीकर तब्बल साडेतीन वर्षे भूमिगत झाले होते. शेवटी शरण आले आणि त्यांना अटक झाली. मात्र कोरोना काळात त्यांना जामीन मिळाला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या घोटाळ्यातील संशयित आरोपी असलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा सवेत सामावून एका चांगल्या ठिकाणी बदली करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे.
काय होता कृष्णूर धान्य घोटाळा?
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी 18 जुलै 2018 रोजी कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे 19 ट्रक पकडले होते. त्यावेळी संतोष वेणीकर नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ आदि धान्य पोलिसांना आढळून आले होते. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला होता. पुढे हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. ज्यात तपास अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे जमा करुन तब्बल 19 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. विशेष म्हणजे यात संतोष वेणीकर संशियत आरोपी होती. तर कारवाईच्या भीतीने वेणीकर हे तब्बल साडेतीन वर्षे भूमिगत होते. शेवटी गेल्यावर्षी 16 जून 2022 रोजी वेणीकर शरण आले आणि त्यांना अटक झाली. तसेच या प्रकरणातील सर्व प्रमुख आरोपींना जामीन नाकारल्यानंतर वेणीकर जवळपास एक वर्षे तुरुंगात रवानगी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या लाटेनंतर हे सर्वजण जामिनावर सुटले.
इतर महत्वाच्या बातम्या: