![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची शरणागती, चार वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर
चार वर्षांपूर्वी नांदेडमध्ये धान्य घोटाळा झाला होता. पोलिसांनी त्याचा छडा लावत 76 लाखांचे गहू आणि 8 लाखांचे तांदूळ जप्त करण्यात आले होते.
![Nanded : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची शरणागती, चार वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर Nanded District Supply Officer main accused in the Krishnur grain scam surrendered and appeared before the court after four years Nanded : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची शरणागती, चार वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/346830aef0b692e137e5cb5fda70d009_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड: महाराष्ट्रभर गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि तात्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर आता न्यायालयासमोर शरण आले आहेत. न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संतोष वेणीकर तब्बल साडेतीन ते चार वर्षांपासून सीबीआय, पोलीस यांना हुलकावणी देत होते, आज अचानक नायगांव न्यायालयासमोर आले.
सन 2018 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नरूल हुसेन यांनी कुष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वाहतूक घेऊन जाणारे 19 ट्रक पकडले होते. त्यावेळी संतोष वेणीकर हा नांदेडचा जिल्हा पुरवठा अधिकारी होता. या प्रकरणाचे जाळे नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या चार जिल्ह्यांपर्यंत पोहोचले असल्याचे उघडकीस आले होते. कृष्णूर धान्य घोटाळ्यात तब्बल 19 जणां विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यात मुख्य आरोपी हे तत्कालीन जिल्हा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे होते. कारवाईच्या भितीने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी वेणीकर हे गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून परागंदा झाले होते. आज अचानक संतोष वेणीकर नायगांव न्यायालयासमोर अवतरले.
या धान्य घोटाळ्यात 19 ट्रक पकडण्यात आले होते. तर या कार्यवाहीत 76 लाखांचे गहू तर 8 लाखांचे तांदूळ सापडले होते. त्यावेळी हे सर्व ट्रक नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील इंडिया अँग्रो मेगा अनाज कंपनी समोर पकडण्यात आले होते. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता,हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते.
सदरील 19 ट्रकांमध्ये गोरगरिबांना देण्यात येणारे स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे गहू, तांदूळ धान्य होते. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती वाढत जाऊन आरोपी वाढत असल्याने, प्रकरण गुंतागुंतीचे होत असतानाच, तात्कालीन पोलीस अधीक्षक मीना या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस अधीक्षक नरूल हुसेन यांच्याकडे दिला होता. यात नरूल हुसेन यांनी मोठ्या शिताफीने कार्यवाही करत 19 जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात इंडिया मेगा कंपनीचे मालक अजय बाहेती, वाहतूक कंत्राटदार पासेवार, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया, हिंगोलीचे कंत्राटदार ललित खुराणा यांना अटक करण्यात आली होती. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांपर्यंत हे प्रकरण पसरले असल्याचे, त्यावेळी तपासत हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर हे प्रकरण गुप्तचर विभागांकडे देण्यात आले होते, या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांची एक वर्ष तुरूंगात रवानगी करण्यात आली होती.
त्यानंतर आता तब्बल साडेतीन ते चार वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कारवाईच्या भीतीने मुख्य आरोपी आणि तात्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर भूमीगत झाले होते. तर जामीन मिळावा यासाठी धफपडणारे वेणीकर यांनी बिलोली व औरंगाबाद न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर कालांतराने शासनाने त्यांची नांदेड वरून परभणी येथे बदली केली. तरीही ते समोर आले नव्हते न्यायालयाने वारंवार जामीन नाकारल्याने साडेतीन ते चार वर्षांनंतर आज अचानक फरार आरोपी संतोष वेणीकर नायगाव न्यायालया समोर शरण आले.
या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महसूल विभागात चांगलीच जुंपली होती. परंतु पुरावे पुढे आल्याने महसूल विभाग हतबल झाला होता. दरम्यान, नायगाव न्यायालयासमोर वेणीकर शरण आल्यावर न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान वेणीकरांना पोलीस कोठडी मिळल्याने आता या घोटाळ्यातीत अजून किती आरोपी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)