National Bravery Award: बाल शौर्य पुरस्कार! स्वतःचा जीव धोक्यात घातला अन् तारेला चिकटलेल्या भावाला वाचवलं
National Bravery Award: आठवीत शिकणाऱ्या लक्ष्मी आनंदा येडलेवार हिला हा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
National Bravery Award: स्वतःचा जीव धोक्यात घालून विजेच्या तारेला चिकटलेल्या आपल्या भावाला वाचवणाऱ्या नांदेडच्या (Nanded) बहिणीची यंदा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी (National Bravery Award) निवड झाली. महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे अध्यक्ष आर. के. जाधव व डॉ. सुशिल नाकोड यांच्या शिफारशीनुसार भारतीय बालकल्याण परिषदेकडून बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावातील आठवीत शिकणाऱ्या लक्ष्मी आनंदा येडलेवार हिला हा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी थडीसावळी गावातील लक्ष्मी येडलेवार ही आपल्या घरात अभ्यास करत होती. याचवेळी तिचा चुलत भाऊ आदित्यचा (वय 4 वर्षे ) ओरडण्याचा तिला आवाज आला. त्यामुळे लक्ष्मी पटकन बाहेर आली. बाहेर येऊन पाहिले तर लक्ष्मीला आदित्य हा विजेच्या तारेला चिकटलेला दिसून आला. त्यामुळे लक्ष्मीने तत्काळ धाडस दाखवत बाजूला पडलेल्या लाकडाच्या सहाय्याने आदित्यला बाजूला केले. पण याचवेळी लक्ष्मीला तारेला स्पर्श झाल्याने ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिच्यावर आणि आदित्य असे दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. वेळेत रुग्णालयात उपचार झाल्याने दोघांचा जीव वाचला. लक्ष्मीने दाखविलेल्या धाडसाची माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनंतर सर्वत्र चर्चा झाली होती. तर तिचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले होते.
राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी नामांकन सादर
लक्ष्मीच्या शौर्याची बातमी प्रसारमाध्यमातून प्रसारित झाली होती. ही बातमी समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी थडीसावळी गावात जाऊन सरपंच, ग्रामस्थांच्या उपस्थितीत लक्ष्मीचा सत्कार केला होता. या सत्कारात त्यांनी राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्या विषयी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अखेर लक्ष्मीच्या नावाची राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.
26 जानेवारीला मिळणार पुरस्कार!
लक्ष्मी ही मंजुळाबाई हायस्कूल खतगाव येथील शाळेत आठव्या वर्गात शिकत आहे. आपल्या शाळेतील मुलीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी लक्ष्मीचे अभिनंदन केलेय. राष्ट्रीय पुरस्कार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित केला जाणार आहे.
सर्वत्र कौतुक!
लक्ष्मीने आपल्या जिवाची बाजी लावून चुलत भावाचा जीव वाचवला होता. तिच्या याच धाडसाची दखल घेत केंद्र सरकारने बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर लक्ष्मीची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती मिळताच पालकांसह पंचक्रोशीत नागरिकांनी आनंद साजरा केला आहे. तर तिच्या या निवडीवरून सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. तसेच पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया लक्ष्मीने दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :