Nanded : ऐकावं ते नवलंच! शर्टचे बटण मोकळे ठेवल्यामुळे चौघांविरोधात गुन्हा दाखल; नांदेडमधील घटनेची चर्चा
Nanded : शर्टचे बटण उघडे ठेवल्याने लोहा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोहा, नांदेड : अनेकांना शर्ट घातल्यानंतर पहिली दोन-चार बटणं लावल्यानंतर अवघडल्यासारखं वाटतं. काहीजण शर्टची सवय नसल्यानेदेखील पहिली दोन-चार बटणं लावत नाही. तर, काही जणा निव्वळ शायनिंग मारण्यासाठी म्हणा अथवा भाईगिरी दाखवण्यासाठी शर्टची बटणं खुली ठेवतात. शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवणे हे चार जणांना जरा महागात पडलं आहे. नांदेडमधील (Nanded) लोहा पोलिसांनी (Loha Police) चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे चारही जण पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यावेळी असभ्य वर्तन म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईची सध्या नांदेड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. गुन्हा दाखल झालेले चौघेजण हे कामानिमित्त आणि पोलिसांनी बोलावले म्हणून आले होते. मात्र, या चारजणांच्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या होत्या आणि मोठ्या आवाजाने बोलत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. ध्यानीमनी नसताना अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने या चौघांनाही धक्का बसला आहे.
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचालकर यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हे सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस स्टेशनला कोणत्याही कामासाठी गेला असाल तरी वर्तवणूक ही चांगली, सभ्य असावी. आवाजही कमी असावा, अन्यथा मुंबई पोलीस कायदातंर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चिंचोलकरांची जोरदार चर्चा
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे आठ दिवसांपूर्वी रूजू झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यावर त्यांनी भर दिला. त्याच्या परिणामी मंगळवारी गणेश चतुर्थी दिनी भाजी मंडई परिसरात वाहतूक कोंडी टळली. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. मात्र, त्यांनी विविध साहित्याची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना शिस्त लावली. त्याशिवाय, पार्किंगलाही शिस्त लावली. त्याशिवाय चिंचोलकर यांनी शहरातील अवैध धंदे, रोडरोमिओंवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.
हिशोब विचारल्याने भाजप आमदार संतप्त, नरसी नामदेव विश्वस्ताला बेदम मारहाण
भाजप आमदार तानाजी मुटकुळे (BJP MLA Tanaji Mutkule) आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या नरसी नामदेव संस्थांच्या (Narsi Namdev Trust) विश्वस्ताला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अंबादास गाडे असं मारहाण झालेल्या विश्वस्ताचे नाव आहे. गाडे यांच्यावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पाठीमध्ये खुर्च्यांनी मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.