एक्स्प्लोर
युती न झाल्यास लढणार नाही, शिवसेनेचे पाच खासदार अस्वस्थ
युती झाली नाही तर भाजपचं जे व्हायचं ते होईल, पण शिवसेनेला दुहेरी आकडाही गाठता येणार नाही असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. अर्थाच या मतांना निर्णयप्रक्रियेत फारसं महत्व नसल्याने सर्वच खासदार अस्वस्थ आहेत.
नागपूर : शिवसेनेच्या खासदारांमधे सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे युतीबाबतची अनिश्चितता. युती झाली नाही तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी होऊ शकते, असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. हे मत पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती आहे. इतकंच नाही, तर युती केली नाही तर आम्ही लढणार नाही असं किमान पाच खासदारांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे.
2014 च्या मोदी लाटेचा फायदा त्यावेळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही झाला. लाखोंच्या फरकाने जिंकत शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत पोहचले. मात्र गेल्या साडेचार वर्षात युतीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. यावेळी युती झाली नाही तर भाजपचं जे व्हायचं ते होईल, पण शिवसेनेला दुहेरी आकडाही गाठता येणार नाही असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. अर्थाच या मतांना निर्णयप्रक्रियेत फारसं महत्व नसल्याने सर्वच खासदार ह्या विषयामुळे अस्वस्थ आहेत.
शिरुरचे खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली याच भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय सेना खासदारांनी घेतला. तो अमंलातही आणल्याची चर्चा आहे. भाजपसोबत युती झाली नाही तर आपापल्या भागातली समीकरणे कशी बदलतात, त्याचा कसा आणि किती फटका बसणार हे शिवसेना पक्षप्रमुखांना कळवण्यात आल्याचं समजतं.
शिवसेनेचे अनेक विद्यमान खासदार हे आजच्या खर्चिक निवडणुकीत हरण्यासाठी पैसा लावायला तयार नाहीत. भाजपशिवाय लढल्यास शिवसेनेला चार ते पाच जागाच मिळतील, असं भाजपचं अंतर्गत सर्वेक्षण सांगतं, तर शिवसेनेच्या अंतर्गत सर्व्हेनुसार युती झाली नाही तर 7 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढल्यास सेना-भाजप या दोन्ही पक्षांना लोकसभेत मोठ्या मुश्किलीने 15 जागा मिळू शकतात. अशा वेळी स्वतःचं नाक कापून घ्यायचं, की मानापमान विसरुन एकत्र लढायचं याचा विचार शिवसेनेला करावा लागणार आहे.
शिवसेना-भाजप युतीमागचा खरा वाद हा जागांचा नाही. कारण आहे भाजपकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक न मिळाल्यामुळे ठेचलेल्या स्वाभिमानाचं. मोठा भाऊ गेल्या निवडणुकीत छोटा झाला याचं. एका विचित्र उंबरठ्यावर उभी असलेली शिवसेना नक्की काय निर्णय घेते, यावर येत्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाचंही वळण ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement