कौतुकास्पद! राजभवनात पक्ष्यांसाठी सुरू झालाय बर्ड कॅफे
Bird Cafe : नागपूरमध्ये राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात पक्षांसाठी बर्ड कॅफे सुरू करण्यात आले आहे.
Bird Cafe : राज्यपाल हा राज्याचा संविधानिक प्रमुख असतो. महाराष्ट्रात अत्यंत देखणी अशी राजभवनांची परंपरा लाभली आहे. नागपूरच्या अतिशय सुरेख आणि दिमाखदार राजभवनात आता एक आगळा वेगळा सृजनशील प्रयोग यशस्वी झाला आहे. नागपुरातील राजभवनात 'बर्ड कॅफे' सुरू करण्यात आला आहे.
सध्याच्या पिढीला गप्पा मारायच्या म्हणजे कॅफे आठवते. पण नागपूरच्या ह्या राजभावनाच्या कॅफेमध्ये गुण्यागोविंदाने, मस्त एकत्र बसून खान पान करणारे पक्षी दिसत आहेत. मोर, पोपट, चिमण्या, खारुताई, नाकतोडे असे पक्षी या बर्ड कॅफेत दिसत आहेत. जवळपास 100 एकरात पसरलेल्या नागपूरच्या राजभवनात हे कॅफे खास इथल्या पक्षी प्राण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. राजभवनांची जबाबदारी असलेले रमेश येवले यांची ही संकल्पना आहे.
याआधी राज भवन हे तसे रखरखीत होते. पण रमेश येवले यांनी येथे सुधारणा करत बदल घडवून आणले आहेत. त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा बायो डायव्हर्सिटी पार्क सुरू केले. त्यानंतर इतरही बदल करण्यात आले. जवळपास 100 एकराच्या परिसरात पसरलेल्या राजभवनात निसर्ग खुलू लागला. तलाव, सुंदर फुलांच्या बागा, कुठे धान्य तर कुठे फळं लावण्यात आली आहेत. त्यानंतर येवले यांनी इथे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीकडून सर्वेक्षण करून घेतले. तेव्हा चक्क 164 प्रजातीचे पक्षी इथे आढळले. राजभवनाच्या आवारात मोरांची संख्याच 60 ते 70 असल्याचे येवले यांनी सांगितले. शहरी भागात असून सुद्धा ह्या परिसरात एवढी जैवविविधता राजभवनात असल्याचे आढळून आले आहे. ही जैवविविधतां जपून ठेवल्याबद्दल येवले यांचे कौतुक करण्यात येत आहे.
बर्ड कॅफेची संकल्पना काय?
विदर्भात प्रखर उन्हाळा असतो. उन्हाळ्यात पाहिजे तेवढे अन्न ह्या प्राणीमात्रांना मिळाले नाही तर? ह्या भावनेतून हा बर्ड कॅफे सुरू करण्यात आला. सकाळी हा बर्ड कॅफे पाहणे पर्वणी असते. विविध प्रजातीचे पक्षी एकाच ठिकाणी वास्तव्य करत दिसते. राजभवनातील या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: