नागपुरात NVCCच्या अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल; संघटनेचा वाद पोलीस ठाण्यात
Nagpur : NVCCच्या आमसभेत शिवीगाळ करून धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. सोमवारीच एनसीएलटीने एनव्हीसीसीची कार्यकारिणी बरखास्त करीत प्रशासक नियुक्तीचा आदेश दिला, हे विशेष.
Nag Vidarbha Chamber of Commerce News Nagpur : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (NVCC) वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेले राडाप्रकरण आता चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणी एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध अंबाझरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली. माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मेहाडिया यांच्यासह राजवंत पालसिंह तुली (गोल्डी), आनंद अग्रवाल तसेच महेशकुमार कुकरेजा यांचा समावेश आहे. एनव्हीसीच्या 17 डिसेंबर रोजी आयोजित आमसभेत शिवीगाळ करुन धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. विद्यमान कार्यकारिणी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सोमवारीच एनसीएलटीने एनव्हीसीसीची कार्यकारिणी बरखास्त करत प्रशासक नियुक्तीचा आदेश दिला, हे विशेष.
या निर्णयामुळे झालेली खळबळ शांत होण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने वादळ निर्माण झाले. शनिवार 17 डिसेंबर रोजी झालेली आमसभा तसेच निवडणुकीवरुन आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांत संघर्ष उफाळून आला. त्यातून दीपेन अग्रवाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे रेकॉर्डिंग करता यावे, म्हणून माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी मुकेश सगलानी आणि त्यांच्या चमूला बोलावले. रेकॉर्डिंग सुरु झाल्यावर अश्विन मेहाडिया यांनी शिवीगाळ करुन धमकावले आणि रेकॉर्डिंग बंद पाडले, अशी तक्रार दीपेन अग्रवाल यांनी दिली होती. अग्रवाल यांचे सहकारी गिरीश लिलडिया यांना रजिस्टरवर सही करु दिली नाही. मेहाडिया आणि त्यांचे सहकारी दडपशाही करत होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला.
घाईगडबडीत आटोपली होती आमसभा
विद्यमान अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडिया यांच्या एककल्ली कारभाराविरुद्ध माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकरा माजी अध्यक्षांनी मागील वर्षी 5 डिसेंबर रोजी दुपारी हल्लाबोल आंदोलनही केले होते. गेल्या काही दिवसांपासून एनव्हीसीसीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. 17 डिसेंबर रोजी आमसभा व निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मेहाडिया यांनी घाईगडबडीत काही मिनिटात आमसभा आटोपली. माजी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे काहीही ऐकून घेण्यात न आल्यामुळे ते बहिष्कार टाकून बाहेर पडले होते.
NVCC वर पहिल्यांदाच ओढवली ही वेळ
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ही विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी जुनी आणि प्रतिष्ठीत संघटना आहे. या संघटनेवर आजतागायत कधीही प्रशासक नेमणूक करण्याची वेळ ओढावली नव्हती. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण व्यापारी आणि उद्योग विश्वात खळबळ माजली आहे.
काय आहे नेमका वाद?
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी ) च्या 11 माजी अध्यक्षांनी वर्तमान अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या डीन नंबरचा मुद्दा उपस्थित करत लेटर बॉम्ब टाकला होता. दरम्यान, सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची कालमर्यादा दिली होती. या पत्रावर एनव्हीसीसीच्या सात डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दोन्ही पक्षांनी आमनेसामने बसून यावर तोडगा काढावा असे निश्चित करण्यात आला. बैठकीत पाच ते सहा सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर अंतिम निर्णय अश्विन मेहाडिया घेतील असे सांगून संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडे त्यांच्या कोर्टात टाकले. बैठकीत मेहाडिया यांनी सांगितले होते की, शक्यतो हे प्रकरण चर्चेतून सुटणारे नाही. माजी अध्यक्ष न्यायालयात जातील तर आम्ही सुद्धा त्यांना न्यायालयातच उत्तर देऊ. दरम्यान, माजी अध्यक्षांविरोधात कठोर शब्दांचा प्रयोग केले होते. त्यानंतर वाद आणखी चिघळला होता.
ही बातमी देखील वाचा...