Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Hasan Mushrif : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर वाशिमहून थेट कोल्हापूरला आल्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी खुलासा केला आहे.
Hasan Mushrif : कोल्हापूर सोडून थेट 623 किमी अंतरावर दुरान्वये संबंध नसलेल्या आणि तुलनेत गरीब समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्याचे पालकत्व गळ्यात पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची पालकमंत्रीपदावरून नाराजी लपून राहिलेली नाही. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर वाशिमहून थेट कोल्हापूरला आल्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी खुलासा केला आहे.
त्यावेळी सविस्तर बैठका घेईन
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितले की, वाशिममध्ये मी झेंडावंदन करून आलो. कोल्हापूरमध्ये मी काही बैठका लावल्या होत्या, म्हणून तिथून लवकर निघालो. या आधीच मी सांगितलं आहे, पालकमंत्रीपदावरून माझ्या भावना मी अजित दादांकडे व्यक्त केल्या आहेत. वाशिम फार लांब आहे, परवा रात्री मी उशिरा पोहोचलो. ज्यावेळी पुन्हा जाईन त्यावेळी सविस्तर बैठका घेईन. मी नाराज नाही पण भावना व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पालकमंत्री अदलाबदलीची कोणतीही चर्चा माझ्यापर्यंत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चे काढतात, आंदोलन करतात
दरम्यान, गेल्या चार दशकांपासून कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. याबाबबत विचारणा केली असता ते म्हणाले की, कोल्हापूर शहर परिसरातील सर्व गावे धरून हद्दवाढ व्हावी, अशी मागणी आमची देखील आहे. हद्दवाढ करणार म्हटलं की मोर्चे काढतात, आंदोलन करतात. लोकप्रतिनिधी देखील आडवे येतात. एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहेत, हद्दवाढीबाबतचा योग्य निर्णय ते करतील, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे स्वत:ला बाजूला केले. दमानिया यांनी धनंजय मुंडेंविरोधात पुरावे देण्यासाठी अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात योग्य ती कारवाई सुरू आहे. सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील काल याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. इतिहासाला अनुरूप जर नसेल तर छावा चित्रपटामध्ये काही दुरुस्त्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या