Nagpur Politics : नागपुरात 'पदवीधरच्या' बदल्यात 'शिक्षक', भाजपमध्ये हिशोब बरोबर झाल्याची चर्चा!
तुम्ही आमचा 'पदवीधर' पाडला, आम्ही तुमचा 'शिक्षक' पाडू, असे ठरवून नागो गाणार यांना पाडण्यासाठी भाजपच्याच 'एका' गटातील लोकांनी काम केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Teachers Constituency Election Result Nagpur Division : नागपूर विभाग पदवीधरची अनेक दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेली जागा दोन वर्षांपूर्वी भाजपने गमावली होती. त्यावेळी विद्यामान आमदारांना डावलून नवीन चहेरा देण्याची रिस्क भाजपने घेतली होती. मात्र त्यात भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते जोखीम पत्कारणार नाहीत, असे वाटले होते. पण झाले उलटेच. आज 12 वर्षे आमदार राहिलेले भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांना पराभवाचे तोंड बघावे लागले.
भाजप समर्थित आणि सतत 12 वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नागो गाणार यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना गेल्या वर्षी झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली असता, त्यावेळी भाजपचे उमेदवार माजी महापौर संदीप जोशी हे भाजपच्या नेत्यांच्या अत्यंत विश्वासातील होते. त्यामुळेच त्यांना पदवीधरची उमेदवारी देण्यात आली होती. निवडून येण्याची पूर्ण खात्री असताना त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामागे भाजपमधीलच दुसऱ्या गटातील काही लोकांचा हात असल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. येथे भाजपमध्ये दोन गट असल्याचे नेहमीच दबक्या आवाजात बोलले जाते. पण उघड उघड बोलण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण असा एखादा निकाल लागला की, पुन्हा अशा चर्चा (अर्थात दबक्या आवाजातच) सुरू होतात.
तुम्ही 'पदवीधर' पाडला, आम्ही 'शिक्षक' पाडू?
शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नागो गाणार हे भाजपच्या दुसऱ्या एका गटाचे खास आहेत. गाणारांच्या उमेदवारीसाठी त्या गटाने जोर लावला होता, असेही सांगण्यात येते. गाणारांच्या नावावर पूर्व विदर्भात भाजपमध्ये मोठी नाराजी होती. अनेक आमदार गाणारांना बदलण्याची आवश्यकता असल्याचे नेत्यांना (खासगीत) सांगत होते. गाणारांना पाठिंबा दिल्यास आपली सीट पडणार, असेही काही भाजप नेते छाती ठोकून नेत्यांना सांगत (अर्थातच खासगीत) होते. त्यामुळे या निवडणुकीतही या दोन्ही गटामध्येच मोठे राजकारण रंगल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही आमचा 'पदवीधर' पाडला, आम्ही तुमचा 'शिक्षक' पाडू, असे ठरवून नागो गाणार यांना पाडण्यासाठी भाजपच्याच 'एका' गटातील लोकांनी काम केल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या गटबाजीसाठी आजपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी (NCP) बदनाम होती. त्याच गटबाजीने आता भाजपलाही पोखरणे सुरू केले की काय, हा विचार करण्याची वेळ आजच्या निकालाने आणली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ही बातमी देखील वाचा...