एक्स्प्लोर
एक प्रामाणिक राजकारणी... दहा वर्ष नगरसेवक, नागपुरात जिथं ट्रस्टी होते तिथंच आता चौकीदार!
नागपुरात दोन टर्म नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी असे अनेकविध पद भूषविणारे देवराव तिजारे आज हलाखीचं जीवन जगतायेत. विशेष म्हणजे, ज्या नागपूर सुधार प्रन्यासचे ते ट्रस्टी होते आज तिथंच ते सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत.
नागपूर : राजकारणाची सध्याची दशा पाहता साधं नगरसेवक ही म्हंटलं तर मोठी फार्च्युनर सारखी गाडी. हातात दोन चार महागडे फोन. प्रशस्त घर आणि कार्यालय. अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे येते. मात्र, नागपुरात दोन टर्म नगरसेवक, एक टर्म महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी असे अनेकविध पद भूषविणारे देवराव तिजारे आज हलाखीचं जीवन जगतायेत. प्रामाणिकपणे केलेल्या राजकारणातून एक दमडीही न कमावणारे देवराव आज वयाच्या 72 व्या वर्षी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चौकीदार म्हणून काम करतायेत.
कितीही मोठा नेता असू द्या. त्याच्या राजकीय प्रवासाची पहिली पायरी म्हणजे नगरसेवक हे पद. आणि याच पदावरून गडगंज संपत्ती जमा करून राजकारणात उंचीवर जाणारे हजारो लोकप्रतिनिधी आपण आजवर पाहिले. मात्र, नागपूरचे देवराव तिजारे राजकारणातून पैसा आणि पैसातून पुन्हा राजकारण या समीकरणाला अपवाद ठरलेले राजकारणी. 19 वर्ष नागपूर महापालिकेचे नगरसेवक. एक वेळ स्थायी समितीचे अध्यक्ष. नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी असलेले देवराव तिजारे आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायला मजबूर आहेत.
याचे कारण म्हणजे देवराव यांनी खऱ्या अर्थाने फक्त समाजासाठी, लोकांसाठी राजकारण केले..अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना फक्त लोकांची कामे करणाऱ्या देवराव यांनी कधीच स्वतःसाठी काहीच मिळविले नाही. राजकारण लोकांसाठीच असते, फक्त सध्या राजकारण्यांनी त्याची व्याख्या स्वतःच्या स्वार्थासाठी बदलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निराशा नाही मात्र खंत वाटते
अनेक दशकांपूर्वी घेतलेले एक प्लॉट आणि त्यावर बांधलेले अवघ्या दोन खोल्यांचे एक घर, मोडकडीस आलेले फर्निचर, एक नादुरुस्त असलेली मोपेड एवढीच त्यांची संपत्ती आहे. कर्ज काढून बनवलेल्या या घरावर रंगरंगोटी करायला ही आज देवराव यांच्याकडे पैसे नाहीत. मात्र, एकेकाळी शरद पवार, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, श्रीकांत जिचकार अशा महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेत्यांसोबत काम करणारे, त्यांच्यासोबत विविध राजकीय मंच गाजवणारे देवराव तिजारे चौकीदार म्हणून काम करताना निराश नाहीत. राजकारणातून पैसे कमावण्यासाठी ते केलेच नव्हते. त्यामुळे आजच्या स्थितीची मुळीच खंत वाटत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कधी कधी लोकं मुर्खात काढतात, टिंगल उडवतात, ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं तेच पक्ष आणि सोबतचे नेते उंचीवर जाऊन मला विसरले याची मात्र खंत वाटत असल्याची त्यांची भावना आहे.
त्यांच्या कुटुंबियांना ही देवराव यांच्या प्रामाणिकपणाचे अभिमान वाटतो. मात्र, आजच्या छोट्या छोट्या राजकारण्यांची श्रीमंती पाहून आणि स्वतःच्या कुटुंबासमोरील सततचे आर्थिक अडचणींना पाहून कधी कधी निराशा ही येते अशी भावना त्यांचे कुटुंबीय व्यक्त करतात.
एकाबाजूला राजकीय पक्ष त्यांचा कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ असावा अशी अपेक्षा व्यक्त ठेवतात. दुसऱ्या बाजूला राजकारणी प्रामाणिक असावेत अशी जनतेची अपेक्षा असते. देवराव दोन्ही अपेक्षांची पूर्तता करतच त्यांचे आयुष्य जगले. स्वतःच्या आयुष्याची उमेदीचे वर्षे आपल्या पक्षासाठी आणि नागपूरच्या जनतेसाठी खर्ची घातली. मात्र, एकेकाळचा हा प्रामाणिक राजकारणी आज उतार वयात चौकीदार म्हणून नोकरी करण्यास मजबूर आहे. प्रामाणिक असणे एवढे वेदना देणारे असेल तर या कठीण मार्गावर चालण्याची प्रेरणा नव्या पिढीला कशी मिळणार याचा ही विचार होण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement