नागपुरात समोर आलं 'आरटीई रॅकेट', खोटी कागदपत्रं सादर करून मुलांना वेगवेगळ्या शाळांत प्रवेश!
नागपुरात खोटी कागदपत्रं दाखवून आरईटी अंतर्गत मुलांचा खासगी शाळेत प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
![नागपुरात समोर आलं 'आरटीई रॅकेट', खोटी कागदपत्रं सादर करून मुलांना वेगवेगळ्या शाळांत प्रवेश! nagpur crime student admission through rte policy by fake document police file case against 19 parents नागपुरात समोर आलं 'आरटीई रॅकेट', खोटी कागदपत्रं सादर करून मुलांना वेगवेगळ्या शाळांत प्रवेश!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/2aa65a7e0aa422c5fc6a54e5a60516591716262249079988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी यासाठी अशा विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत (RTE Education) खासगी वेगवेगळ्या शाळांत प्रवेश दिला जातो. मात्र याच आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्रं जमा करून आपल्या मुलाचा प्रवेश करून घेण्याचा प्रकार नागपुरात उघड झाला आहे. या प्रकरणामुळे सध्या राज्यभरात अशा प्रकारे किती प्रवेश झालेले आहेत, असे विचारले जात आहे.
19 पालकांविरोधात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे आरटीई प्रवेश
6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे. नागपुरात आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती. त्यानंतर आधी शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांनी प्राथमिक चौकशी केल्यावर त्यात तथ्य आढळले. त्यानंतर शिक्षण विभागाने नागपूर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून तपास चालू
दरम्यान, ज्या एजंटच्या माध्यमातून हे प्रवेश घेण्यात आले होते, त्या एजंटचा आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे जातीचे दाखले व इतर दस्तावेज बनवून दिले होते, त्यांचे आपापसात काही संगनमत आहे का, याचा तपास केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून हे खोटे दस्तावेज बनवून घेण्यात आलेत का याचाही तपास पोलीस करत आहेत. तसं आढळल्यास प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आरोपी बनवले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दरम्यान नागपूर येथील विविध शाळा व्यवस्थापनांनी आपापल्या शाळेत आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची पुन्हा तपासणी करावी अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)