नागपुरात सॅनिटायझर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू
गौतम गोस्वामी हे नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. मात्र त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. व्यसनामुळे अलीकडे त्यांच्याकडे पैसेही राहत नव्हते. 21 जून रोजी घरी असताना पुरेशी दारू न मिळाल्यामुळे आणि दारू खरेदी करण्यासाठी आणखी पैसे नसल्यामुळे गौतम यांनी कुटुंबीयांचे लक्ष नसताना घरातीलच असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरच्या बॉटल मधून सॅनिटायझर प्राशन केले.
नागपूर : मनसोक्त दारू प्यायला न मिळाल्याने एका मद्यपीने स्वतःची झिंग वाढवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. गौतम गोस्वामी असे मृत इसमाचे नाव असून ते नागपुरच्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुजरनगर परिसरात राहत होते.
गौतम गोस्वामी हे नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. मात्र त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. व्यसनामुळे अलीकडे त्यांच्याकडे पैसेही राहत नव्हते. 21 जून रोजी घरी असताना पुरेशी दारू न मिळाल्यामुळे आणि दारू खरेदी करण्यासाठी आणखी पैसे नसल्यामुळे गौतम यांनी कुटुंबीयांचे लक्ष नसताना घरातीलच असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरच्या बॉटल मधून सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारानंतर काही तासांनी बरे वाटल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांना मेयो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदा तब्येत बिघडल्यानंतर दरम्यानच्या काळात गौतम यांनी पुन्हा सॅनिटायझर प्राशन केले असावे आणि त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गौतम गोस्वामी यांच्या मृत्यू प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, दीड महिन्यापूर्वी नागपुरात शांतीनगर परिसरात आशु गुप्ता नावाच्या चहा टपरी चालकाने सॅनिटायजर विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. सॅनिटायझरमध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहोल असल्याने त्याच्यातून ही दारूसारखीच नशा येते हे ओळखून आशु गुप्ता ने परिसरातील काही मद्यपीना दुप्पट दराने सॅनिटायजर विकणे सुरु केले होते. हळू हळू ही बाब इतर भागातील मद्यपींपर्यंत पोहोचुन मोठ्या संख्येने मद्यपी आशु गुप्ताच्या दुकानावर सॅनिटायझर घ्यायला येऊ लागल्याने पोलिसांची शंका बळावली होती. तेव्हा पोलिसांनी शांतीनगर परिसरात आशु गुप्ताच्या घरी धाड टाकून सॅनिटायझरच्या अनेक बॉटल्स जप्त केल्या होत्या. तसेच आशु गुप्ताला अटक ही केली होती. आता तर सॅनिटायझर प्यायल्याने एकाचा जीव गेला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी परवानगी नसताना सॅनिटायझर बेकायदेशीररीत्या विकणाऱ्या आणि मद्यपीना भुलवून अशा धोक्यात ढकलणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.