Temple Dress Code : नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू; अशोभनीय, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश नाही, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय
Nagpur News: पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे.
नागपूर : महाराष्ट्रातील मंदिरांवरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झालेला. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक घोषणा केली आहे. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे.
नागपुरातील चार मंदिरात ही संहिता लागू
महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे... मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. सध्या नागपुरातील चार मंदिरात ही संहिता लागू करण्यात आली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न आहेत. राज्य सरकारची देखील सरकारी कार्यालयांसाठी वस्त्र संहिता आहे. मग मंदिरासाठी का नको? असा सवाल देखील या वेळी उपस्थित करण्यात आला.
कोणत्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू? (Dress Code in Nagpur Temple)
गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप
अशोभनीय, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश नाही
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व मंदिरात ती लागू व्हावी अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाची नागपुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सुनील घनवट यांनी ही माहिती दिली आहे. जर कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहे. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न
काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे म्हटले गेले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने यू टर्न घेत पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले