विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut: विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटत आहात याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरत असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut: राहुल गांधी विरोधी पक्षनेते असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत ते पाहत अमित शाहांपासून सगळे हादरले आहेत. विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटत आहात याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरत असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारकडून विरोधी पक्षनेता नेमला जात नसल्याने हल्लाबोल केला.
सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे, संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही, त्या दृष्टीने मांडणी निकालांची करायची हे अमित शाह आणि मोदी यांच्या राजकारणाने ठरवलं आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद टाळता आलं नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
मुंबई, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न
ते पुढे म्हणाले की, आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून थंडगार आहात याचा अर्थ तुम्ही अमित शाहांच्या दबावाखाली आहात.
फडणवीस सरकार गुजरातचे मिंधे आहे
त्यांनी सांगितले की, अमित शाहांचा अजेंडा मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा आहे त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहात. थोड्या दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर देखील गुजरात पूर्णपणे घुसलेला आहे. उंबरगाव, डहाणू, पालघर हे गुजरातच्या अजेंड्यावर आहे म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून काढली आहे. महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवाव लागेल, कारण फडणवीस सरकार गुजरातच मिंधे आहे. भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर.
मिंध्यांचा पक्ष अमित शाहांचा पक्ष
संजय राऊत म्हणाले की, महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना ही महायुती आहे का? एक डुप्लिकेट पक्ष बोगस जो अमित शाहांचा आहे, तेच भाजप बरोबर युती करतात. मिंध्यांचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत. शिंद्यांची जर ताकद असती तर प्रदेशाध्यक्षांकडून एवढे अपमान होऊन ते रडत गेले नसते अमित शाहांकडे. त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचा म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाही. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या मतानं त्यांना आलेली सूज आहे आणि पैसे यंत्रणा बाकी. अमित शाहाचं इंजेक्शन टॉनिक आहे.
कोणाची हिंमत आहे सांगण्याची?
अजित पवार असं म्हणतात की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला पाहतो की याच्यामध्ये तारतम्य नाही. ते म्हणाले की, पार्थ पवारच्या पिताश्रींच एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? जय शाहाला मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? तसंच पार्थ पवार सांगतील, पार्थ पवार एखादा प्रपोजल घेऊन आलेला आहे, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये? स्वतः अजित पवारांना, प्रफुल पटेलांना मोदींनी वाचवलं असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
























