(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gondia News : 'तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही हे स्पष्ट होत नाही', पोलीस कर्मचाऱ्याच्या विशेष रजेच्या अर्जाला दोन महिन्यांनी उत्तर अर्ज
Gondia Police : आता तब्बल दोन महिन्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला वरील पत्र मिळाला असल्याने आता दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार असा प्रश्न पोलिस कर्मचाऱ्यासमोर पडला आहे.
Gondia News : तुम्ही सरकारी नोकरीत असाल, तुम्हाला कुत्रा चावला असेल आणि उपचारासाठी तुम्हाला सुट्टी हवी असेल तर तुम्हाला आधी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. चावणारा कुत्रा पिसाळलेला होता, असे प्रमाणपत्र सादर केले तरच सुट्टी मिळू शकते. प्रमाणपत्र नसेल तर अर्ज नामंजूर होऊ शकतो. अशीच घटना गोंदिया येथील पोलीस (Gondia Police) कर्मचाऱ्यासोबत घडली.
जिथे सामान्य नागरिक जाण्यासाठी मागेपुढे करतात तेथे कर्तव्यदक्ष पीलीस जातात. त्यामुळे अनेकवेळा पोलिसांना दुखापत आणि अपघातांनाही सामोरे जावे लागते. रात्री-बेरात्री गस्तीवर असताना मोकाट कुत्रे मागे लागतात. अनेकदा ते चावतातही, गोंदिया पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावला. गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. परिणामी या पोलिसाने विशेष रजेसाठी अर्ज केला. त्याच्या अर्जाला जिल्हा पोलीस कार्यालय अधीक्षकांनी काहीसे रंजक उत्तर दिले.
कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला असेल तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय (मंजूर) आहे. मात्र, तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र (पिसाळलेला कुत्रा चावल्याचे) सोबत जोडलेले नाही', असे म्हणत अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत केला आहे.
दोन महिन्यांनंतर शोधणार का चावा घेणारा कुत्रा
पोलीस कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्यानंतर त्यांनी उपचारासाठी सुट्टी हवी म्हणून अर्ज केला. तसेच उपचारही घेतले. त्यानंतर जखमा भरल्यानंतर कर्तव्यावर रुजूही झाला. आता तब्बल दोन महिन्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला वरील पत्र मिळालं असल्याने आता दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यासमोर पडला आहे. मात्र सोशल मीडियावर हा पत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांबद्दल गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
पोलीस म्हणतात 'टायपो' एरर
एका पोलीस कर्मचाऱ्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुट्टीच्या संबंधाने नुकतेच तसे पत्र दिले असून, त्या पत्राची प्रत व्हायरल झाली आहे. तर यासंदर्भात गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लिहिताना संबंधित क्लर्ककडून चूक झाल्याचं सांगितलं तर पोलीस शिपाई यांच्या सुट्टीच्या अर्जाला दोन महिन्यानंतर उत्तर का मिळाले असे विचारले असता दीड ते दोन महिने या प्रोसेसला लागतात असं सांगण्यात आलं.
ही बातमी देखील वाचा...