Nagpur RTO : नागपूर बायपासवर ट्रक चालकांकडून 'एंट्री'च्या नावावर अवैध वसुली: आरटीओ निरीक्षकासह दोन दलाल अटकेत
RTO पासून तर परिवहन आयुक्तांपर्यंत तसेच मंत्र्यांनाही या अवैध वसुलीसंदर्भात तक्रार केल्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र एसीबीच्या कारवाईमुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहेत.
Nagpur RTO News : नागपूर जिल्ह्याच्या बायपासवरुन जाणाऱ्या ट्रक चालकांकडून 'एंट्री'च्या नावावर होणाऱ्या अवैध वसुली संदर्भात अनेकवेळा परिवहन आयुक्तांपासून तर मंत्र्यांपर्यंतही तक्रारी झाल्या. मात्र त्यावर कारवाई झाली नाही मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau) ने केलेल्या कारवाईत आरटीओ निरीक्षकासह त्याने वसुलीसाठी नेमलेल्या दोन दलालांना वसुली करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचाराच्या नावाने प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) नेहमीच चर्चेत राहिले आहे. सामान्य नागरिकांच्या कामांपासून तर वाहनांना चेकपोस्टवर अडवून त्यांच्याकडून होणारी अवैध वसुली सर्वश्रुत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना यासंदर्भात युवक कॉंग्रेसने गेल्यावर्षी सतत आंदोलनही केले होते. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपासून तर परिवहन आयुक्तांपर्यंत तसेच मंत्र्यांनाही या अवैध वसुलीसंदर्भात तक्रार केली होती. मात्र यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती उलट आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, हे विशेष. मात्र एसीबीच्या कारवाईमुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले आहेत.
ट्रक चालकांना द्यावी लागते 500 रुपयांची 'एंट्री'
प्राप्त माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) ग्रामीण आरटीओच्या (RTO) निरीक्षकासह दोन दलालांना ट्रकचालकाकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने आरटीओ विभागात खळबळ उडाली. आरटीओ निरीक्षक अभिजित सुधीर मांढरे (वय 39 वर्षे), करण मधुकर काकडे (वय 28 वर्षे, रा. रामटेक) आणि विनोद महादेवराव लांजेवार (वय 48 वर्षे, रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर) यांचा समावेश आहे. मांढरे ग्रामीण आरटीओमध्ये कार्यरत असून, त्यांची पोस्टिंग कांद्री चेकपोस्टवर होती. 33 वर्षीय ट्रकचालक बुधवारी (8 फेब्रुवारी) मनमाडहून रेवाकडे जात होता. मांजरे यांच्या दोन दलालांनी त्यांचे वाहन कांद्री पोस्टवर अडवले. त्याच्यावर जबरदस्तीने चालान कारवाई केली आणि 500 रुपयांची एंट्रीही मागितली.
शिवीगाळ अन् वाहन जप्त करण्याची धमकीही
चलान असूनही पैसे मागितल्याने ट्रकचालकाने नकार दिला. दोन्ही दलालांनी मांजरे यांच्या उपस्थितीत ट्रकचालकाला शिवीगाळ करुन वाहन जप्त करण्याची धमकी दिली. जबरदस्तीने 500 रुपये देऊन पुढे निघून गेला. काही अंतर गेल्यावर त्यांच्या गाडीचा ब्रेक लागला. मालकाने गाडी नागपूरला नेण्यास सांगितले. ट्रकचालक पुन्हा नागपूरच्या दिशेने वळला. त्यानंतर पुन्हा त्यांचे वाहन थांबवून प्रवेशासाठी 500 रुपये मागितले. ट्रक चालकाने त्याच्या साहेबांना माहिती दिली. मालकाने एसीबीकडे तक्रार करण्यास सांगितले. ट्रकचालकाने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मांढरे यांच्या उपस्थितीत दलालांना 500 रुपये घेताना पकडण्यात आले.
मांढरेंची पत्नी आरटीओत इन्स्पेक्टर
मांढरे यांच्या पत्नी गीता शेजवळ नागपूर आरटीओमध्ये इन्स्पेक्टर आहेत. दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. मांढरे आणि शेजवळ यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु असल्याचा दावा एसीबीच्या सूत्रांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी वेगवेगळ्या शहरात अनेक एकर जमीन खरेदी केली. गीता शेजवळ यांनी उस्मानाबाद येथे कार्यरत असताना पात्रता प्रमाणपत्रात घोटाळा केला होता. त्यात पोलिसांनी गीता आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. विभागीय चौकशीत गीताही दोषी आढळल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. आरटीओच्या सूत्रांनुसार, मांढरे यांच्यासह त्यांची पत्नी गीता यांचा भाऊ मनोज शेजवळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच ग्रामीण आरटीओच्या विविध चेकपोस्टवर ट्रकचालक आणि मालकांना धमकावून वसुली केल्याच्या आरोपाची अनेक प्रकरणे समोर आली. मात्र, असे असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही बातमी देखील वाचा...