'चंद्रशेखर बानकुळेंनी मला गंडवलं, 34 वर्ष साथ, तरीही पक्षाकडून अन्याय, आता राम राम करतोय', विदर्भात बड्या नेत्याचा भाजपला रामराम
Nagpur BJP : पक्षावर नाराज असलेले विदर्भातील नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
Nagpur BJP : पक्षावर नाराज असलेले विदर्भातील नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून छोटू भोयर भाजपवर नाराज होते. सोमवारी सकाळी छोटू भोयर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आज, छोटू भोयर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी 34 वर्षांपासून झटत आलोय. पण त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी सांगितलं.
भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भोयर म्हणाले की, ‘34 वर्षे भाजपसोबत काम केलं. तो पक्ष सोडताना मनात वेदना होत आहेत. मात्र ज्या भाजपला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केलं, अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.‘ आजच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसकडून अद्यापही विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही, असेही भोयर यांनी सांगितलं.
भाजपकडे मी विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला प्रत्येक वेळेला मी या निवडणुकीत उभा राहणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र नेमकं उलट झालं. मला उमेदवारी नाकारण्यात आली. बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारताना काय कारणं होती, की त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणि आज ती सर्व कारणं नाहीशी झाली आहेत का? याचं स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिलं पाहिजे. या मतदारसंघात भाजपकडे मोठी आघाडी आहे, असं म्हटलं जातं. मात्र 14 डिसेंबरला मतमोजणी होताना भाजपकडे जेवढी आघाडी आहे तेवढ्याच मतांनी भाजप पराभूत झालेला पाहायला मिळेल. भाजपमधील एक मोठा गट मला या निवडणुकीत निश्चितपणे साथ देणार आहे, असेही भोयर म्हणाले.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक राहिलो आहे. संघाने कधीच अन्याय-अत्याचार सहन करा असं शिकवलेलं नाही. आज जरी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असलो, तरी 34 वर्षे ज्या संघाची शिकवण घेतली. ते विचार (संघाचे विचार) एक दोन दिवसात मनातून नाहीसे होणार नाहीत, असे भोयर यांनी सांगितलं. काँग्रेसमधून विधान परिषदेची उमेदवारी नक्कीच माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. मात्र फक्त उमेदवारीसाठी मी राजीनामा देतोय असं नाही. तर पक्षात ज्या पद्धतीचा व्यवहार झाला त्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे, असं भोयर म्हणाले.